नंदुरबार : जातीय तेढ निर्माण करणाऱ्या सोशल मीडियावरील पोस्ट अनेक जण भावनेच्या भरात लाईक, शेअर किंवा फॉरवर्ड करतात. त्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागतो. तर अनेकांना जेलची हवा खावी लागते. जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत अशा प्रकारचे तीन ते चार गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे अशा पोस्ट लाईक, शेअर किंवा फॉरवर्ड करताना काळजी घेणेच अधिक सोयीस्कर आहे.
सध्या काही युवकांमध्ये जात, धर्म, धार्मिक, पारंपरिक याविषयी विशेष टोकाची भावना आहे. त्याला विविध कारणे असली तरी ही भावना सोशल मीडियावर उमटली तर त्याचा अर्थाचा अनर्थ होऊन कायद्याच्या कचाट्यात अडकावे लागते. अनेक जण दुर्लक्ष करतात, तर काही जण त्याला अधिक रंगवून पुढे पाठवतात आणि फसतात. त्यामुळे अशा पोस्टबाबत दहा वेळा विचार करणे आवश्यक आहे.
अशी घ्या काळजी...
सोशल मीडियावर आलेली कुठलीही पोस्ट लाईक, शेअर व फॉरवर्ड करण्याआधी तिची सत्यता तपासून पाहा. पोस्ट टाकणारी व्यक्ती किती विश्वासू आहे. त्यानेच ती टाकली आहे का? हे तपासावे.
काही जण मुद्दाम धार्मिक भावना भडकविण्यासाठी इतिहासाचा चुकीचा संदर्भ देऊन पोस्ट टाकत असतात. त्याला बळी पडू नये. आवडली, नाही आवडली तरी ती आपल्यापर्यंतच मर्यादित ठेवणे सोयीस्कर ठरते.
आक्षेपार्ह पोस्टला साधे लाईक जरी केले तरी तुम्ही कायद्याच्या कचाट्यात सापडू शकतात. अशा पोस्टबाबत शासनाने विविध कायदे व नियम घालून दिले आहेत, त्याचे पालन होणे आवश्यक आहे.
मुलींनो डीपी सांभाळा...
n सोशल मीडियावर अर्थात फेसबुक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, ट्विटर यावर आपला डीपी ठेवताना अनेक जण आपला फोटो ठेवतात. काही जण आपल्या मुलींचा, पत्नीचा डीपी ठेवतात. त्याचा दुरुपयोग करणारे अनेक सायबर गुन्हेगार समाजात आहेत. त्यामुळे डीपी किंवा प्रोफाईलचा फोटो केवळ जवळच्या लोकांनाच पाहता येईल या ऑप्शनचा उपयोग करणे आवश्यक आहे.
सोशल मीडियाचा वापर करा सांभाळून...
n सोशल मीडिया हे ज्ञानाचे भांडार आहे. त्याचा उपयोग आपण कसा करावा हे आपल्यावर अवलंबून आहे.
n मात्र सोशल मीडियामुळे अनेक जण भलत्याच मार्गाला जातात आणि फसतात. ते टाळता येऊ शकते. फक्त आपण सजग असले पाहिजे.
सोशल मीडियावर बदनामी : अनेकांवर गुन्हे
गेल्या दोन वर्षात सोशल मीडियाच्या माध्यमातून कुणाची बदनामी करणे, कुणाच्या जातीय, धार्मिक भावना भडकावणे याविषयीच्या सोशल मीडियाच्या पोस्टमुळे अनेकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. काही गुन्हे हे बाहेरच्या पोस्टला लाईक करणे किंवा ती इतर ग्रुपवर शेअर करणे यामुळे गुन्हे दाखल झाले असल्याचे चित्र आहे.
कायदा व सुव्यवस्था बिघडवू शकतील अशा कुठल्याही पोस्टला कुणीही थारा देऊ नये. काही जण मुद्दाम अशा पोस्ट टाकून काहींना कायद्याच्या कचाट्यात आणण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे कुठलीही पोस्ट ग्रुपवर लाईक, शेअर, फॉरवर्ड करताना शहानिशा करावी. अशा पोस्टवर सायबर क्राईम कक्ष लक्ष ठेऊन असतो.
- रवींद्र कळमकर, पोलीस निरीक्षक, सायबर सेल, नंदुरबार