नंदुरबार: नदीच्या पाण्यात बुडणाऱ्या चुलत भावाला वाचवितांना स्वत:चा प्राण गमावलेल्या धडगाव येथील आदित्य विजय ब्राह्मणे या बालकाला मरणोत्तर प्रधानमंत्री राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. २२ जानेवारी रोजी त्याच्या पालकांना नवी दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. आदित्य आणि त्यांचा चुलत भाऊ नदीच्या किनाऱ्याजवळ खेळत होते. खेळताना त्यांचा चुलत भाऊ बुडू लागला. हे पाहून आदित्यने धोका असलेला उतार लक्षात न घेता खोल पाण्यात उतरून आपल्या चुलत भावाला वाचविण्याचा प्रयत्न केला.
दुर्दैवाने, आदित्य खूप खोल गेला, त्यामुळे त्याला लगेच शोधणे कठीण झाले. आदित्यचा प्रयत्न व्यर्थ गेला आणि त्याचा बुडून मृत्यू झाला. मात्र, कठीण प्रसंगात आपले अतुलनीय शौर्य दाखविले. त्याच्या या शौर्यपूर्ण प्रयत्नाबद्दल त्याचा मरणोत्तर शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार २२ जानेवारी रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान केला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी २३ जानेवारी रोजी राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधतील. विजय ब्राह्मणे हे धडगाव येथे माध्यमिक शिक्षक आहेत. त्यांना दोन मुलं असून, आदित्य हा मोठा होता.