नंदुरबार : नंदुरबार व शिंदखेडा तालुक्यासाठी वरदान ठरणा:या प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेच्या कामाला गती मिळू लागली आहे. आता 132 के.व्ही. वीज उपकेंद्राला ग्रीड कनेक्टिव्हीटी देण्याचे निर्देश महापारेषण कंपनीने दिले आहेत. यामुळे मृगजळ ठरलेली ही योजना आता दृष्टीपथात येऊ लागली आहे. दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यात आयटीआय झालेल्या तब्बल 500 जणांना ग्राम विद्युत व्यवस्थापक म्हणून भरती करून घेण्यात येणार आहे.जिल्ह्यातील वीज प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या पुढाकारातून उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक घेण्यात आली. त्यात या योजनेच्या वीज प्रश्नासह जिल्ह्यातील अनेक वीजेचे प्रश्न सोडविण्याचे आदेश मंत्री बावनकुळे यांनी दिले. प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेचे काम गेल्या 12 वर्षापासून रखडले आहे. मध्यंतरी नंदुरबार व शिंदखेडा तालुक्यातील शेतक:यांनी आंदोलन केल्यानंतर कामाला गती देण्यात आली. आता 132 के.व्ही.उपकेंद्राला ग्रीड कनेक्टीव्हिटी देण्याचे महापारेषण आदेश दिले. गेल्या चार महिन्यांपासून हा प्रश्न प्रलंबीत होता. तापी नदीत पाणी असूनही वीज पुरवठय़ाअभावी पाणी देता येत नव्हते. गुरुवारी मुंबई येथे झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. कागदपत्रे, नकाशे, उतारे सादर करून प्रोसेसिंग फी देखील भरल्याचे रावल यांनी उर्जामंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. तापीवरील या योजनेमुळे भुयारी पाईपलाईनच्या माध्यमातून बलदाने धरणात पाणी आणलं जाईल. प्रकाशा बुराई उपसा विद्युत जलसिंचन योजनेअंतर्गत अतिरिक्त वीज उपलब्ध केली जाणार आहे. या योजनेसाठी एक्सप्रेस फिडर घेतले जातील. जेणेकरून विद्युत भारनियमनाचा त्रास होणार नाही. बैठकीत जिल्ह्यातील इतर वीज प्रश्न देखील मार्गी लावण्यात आले आहेत. त्यात जिल्ह्यात आयटीआय झालेल्या सुमारे 500 ग्राम विद्युत व्यवस्थापकांची भरती तात्काळ करण्यात येणार आहे.नंदुरबार पालिकेची वीज यंत्रणा मेडा च्या मार्फत सौर उज्रेवर करण्यासाठी डीपीआर तयार करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. पालिका हद्दीतीलच विद्युत वाहिण्या या भुमिगत करण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. बिरसा मुंडा आणि नरेगाच्या माध्यमातून जिल्ह्यात सुमारे एक हजारापेक्षा अधीक विहिरी बांधल्या गेल्या आहेत. दुष्काळ परिस्थितीत या विहिरी जीवनदायीनी ठरणार आहेत. या सर्व विहिरींना सौर पंपद्वारे वीज उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले. अडीच लाखाचा हा पम्प आदिवासींना योजनेअंतर्गत अवघ्या दहा हजारात मिळणार आहे. नवापूर, अक्कलकुवा येथे 132 के.व्ही.चे नवीन उपकेंद्र प्रस्तावीत निधीतून होणार आहे. सारंगखेडा यात्रा परिसरातून जाणा:या उच्च दाबाच्या वीज वाहिन्या स्थलांतरीत करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल. नवापूर ते आमलान सिद्धीप्रिया इको टेक्स्टाईलसाठी स्वतंत्र एक्सप्रेस फिडर मंजुरी देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. नवापूर व अक्कलकुवा येथे नवीन 132 के.व्ही. उपकेंद्र करण्यासही मंजुरी देण्यात आली.
प्रकाशा-बुराई योजनेला मिळणार गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2019 12:50 PM