लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शासनाकडून भरड धान्य खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असले तरीही शेतकरी बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांकडे प्राधान्याने धान्याची विक्री करतात. शेतकऱ्यांकडून खरेदी केला जाणारा हा माल मात्र हमीभावाने खरेदी होत नसल्याचे समोर आले आहे. यातून कोणत्याही शेतकऱ्याला धान्य विक्री केल्यानंतर हमीभावाने पैसेच मिळाले नसल्याचे समोर आले आहे. नंदुरबार बाजार समिती ही जिल्ह्यातील सर्वाधिक व्यस्त बाजार समित्यांपैकी एक आहे. रब्बी हंगामात गहू, मिरची आणि खरीप हंगामात ज्वारी, बाजरी, मका, कडधान्य यांसह विविध धान्य मालांची खरेदी करण्यात येत असल्याने शेतकरी येथे हजेरी लावतात. परंतु या शेतकऱ्यांना शासनाने ठरवून दिलेला हमीभावच मिळत नसल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्यांचा माल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून धान्य उचल करणारे मोठे व्यापारी त्यांच्या वाहतूक, बारदान आणि मार्केट फीवरून दर ठरवत असल्याने येथील व्यापाऱ्यांचा नाईलाज होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. यात शासनाकडून केवळ एफएक्यू दर्जा असलेले धान्यच खरेदी केंद्रावर खरेदी केले जात असल्याने डागी व काळा पडलेला माल मातीमोल दरात व्यापारी खरेदी करत असल्याचे चित्र दिसून आले आहे. विशेष म्हणजे व्यापाऱ्यांना लागणारी मार्केट फी, बारदान, तोलाई आदींची वसूलही शेतकऱ्यांकडूनच होते.
बाजाराचे दर वेगळेच शासनाकडून ज्वारीला किमान २ हजार ६४० रूपये प्रतीक्विंटल, बाजरी २ हजार १५० रूपये तर मका १ हजार ८५० रूपये प्रती क्विंटल हमीभाव देण्यात आला आहे. परंतू शासनाने ठरवून दिलेल्या दरांमध्ये व्यापारी मालच खरेदी करत नसल्याचे बाजार समितीत दिसून येत आहे.
हे आहेत आजचे भाव बाजारात व्यापा-यांकडून चांगली ज्वारी १ हजार ६५० ते ८०, काळी पडलेली ज्वारी साधारण १ हजार १००, बाजरी १ हजार ते १ हजार ३०० तर मका १ हजार ३०० रूपयांपासून खरेदी करण्यात येतो. बाजार समिती शेतक-यांकडून एक रूपयाही घेत नाही. मात्र व्यापा-यांकडून मार्केट फी घेतली जात असल्याचे सांगण्यात आले.
दरांवर नियंत्रण नाहीच : बाजार समितीत होणा-या दरांच्या निर्धारणाबाबत कोणाचेही नियंत्रण नसल्याची माहिती आहे. बाहेरील व्यापा-यांच्या दरांवरून येथे धान्याची खरेदी करण्यात येत असल्याची माहिती आहे.
सरकारने जाहिर केलेला हमीभाव जाहिर करुनही त्यांचा शेतमाल त्या भावाने खरेदी होत नाही. यामुळेच शेतक-यांनी आंदोलन केले आहे. शेतमाल हमीभावानुसार खरेदी व्हायला हवा. बाजार समित्यांनीही याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे. शेतकरी बाजारात माल घेऊन जाण्यासाठी वाहतूक खर्च करतो. माल विक्री करताना मात्र वाहतूक खर्चही वसूहोत नसल्याचे प्रकार घडतात. -जयसिंग माळी,शेतकरी, मोड. तळोदा.