लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 24 : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्यावतीने अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे, ग्रामीण भागातील अनुसचित जातीच्या वस्तीत सुधारणा अर्थात दलित वस्ती सुधारणा योजनेत 2016-17 या वर्षात मंजूर केलेली विकासकामे यंदा मार्च अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता मावळली आह़े या योजनेसाठी दोन कोटी 51 लाख 67 हजार रूपयांची भरघोस तरतूद करूनही विकासकांना गती मिळालेली नाही़ प्रामुख्याने नंदुरबार आणि शहादा या दोन तालुक्यातील मोठय़ा गावांमधील दलित वस्त्यांकडून आलेल्या प्रस्तावानंतर ही कामे मंजूर करण्यात आली होती़ लोकसंख्यानिहाय वर्गवारी असलेल्या या गावांना रस्ते काँक्रिटीकरण, बंदीस्त गटार, समाजमंदीर, संरक्षक भिंत आणि हायमस्ट लॅम्प उभारण्याच्या कामांना मंजूरी देण्यात आली होती़ यातील बहुतांश कामे पूर्ण झाल्याचा दावा करण्यात येत असला तरी, अद्यापही 80 टक्के कामे अपूर्ण असल्याचे स्थानिक रहिवाशांकडून सांगण्यात येत आह़े यात विशेष म्हणजे गेल्या 2015-16 मध्ये कामे मंजूर झालेल्या गावांचा पुन्हा समावेश करून त्यांना पुन्हा त्याच प्रकारच्या कामांचा निधी देण्याचा प्रकारही उघडकीस आला आह़े विशेष म्हणजे जिल्हास्तरावर समाजकल्याण अधिकारी यांच्याकडे ठोस अशी कोणतीच माहिती उपलब्ध नाही़ 2016-17 या वर्षात नंदुरबार तालुक्यात हाटमोहिदे, समशेरपूर व नगाव येथे समाजमंदिर, कोपर्ली, कार्ली, ढंढाणे येथे बंदीस्त गटार, ढंढाणे, खोक्राळे, लहान शहादा, करजकुपे, धुळवद, धानोरा, रनाळे व दुधाळे येथे कॉक्रिट रस्ते आणि सिंदगव्हाण संरक्षक भिंत बांधण्याच्या कामांना मंजूरी देण्यात आली होती़ यापैकी ब:याच ठिकाणी कामांना रडतखडत सुरूवात होऊन मध्ये कामे बंद पडली होती़ ही कामे पुन्हा नव्याने सुरू होऊन आता पूर्णत्वास येत असल्याची माहिती देण्यात आली आह़े या कामांसाठी एकूण खर्च 62 लाख 23 हजार 877 रूपयांचा निधी मंजूर होता़ योजनेंतर्गत शहादा तालुक्यातील मोहिदे तर्फे शहादा, जयनगर, सुलतानपूर, अनरद, वरूळ व लोंढरे येथे नवीन समाजमंदिर, मोहिदे त़श दोन ठिकाणी काँक्रिट रस्ता, लोणखेडा एकता नगर वॉल कंपाऊंड व समाजमंदिर, वरूळ आंबेडकर नगर काँक्रिट रस्ता, अनरद येथे समाजमंदिर दुरूस्ती व दोन ठिकाणी काँक्रिट रस्ता , कलसाडी, सोनवद तर्फे शहादा, पुरूषोत्तम नगर, कुरंगी येथे काँक्रिट गटार व रस्ता, धांद्रे कॉक्रिट रस्ता, चिखली बुद्रुक व दिगर काँक्रिट रस्ता, अंबापूर, सोनवद त़श येथे काँक्रिट रस्ता निर्माण करण्यासाठी अडीच लाख ते 10 लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात होता़ ही कामे 80 टक्के पूर्ण झाल्याचा दावा शहादा पंचायत समितीकडून करण्यात येत आह़े प्रत्यक्षात अद्यापही 50 टक्के विकासकामे प्रलंबित असल्याची माहिती दलित वस्त्यांमधील ग्रामस्थ देतात़
नंदुरबारातील दलित वस्त्यांचा विकास लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 12:50 PM