ऑनलाईन लोकमतशहादा, दि़ 24 : जिल्हा विधी सेवा प्राधीकरण, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी येथे महाराजस्व अभियानांतर्गत शासकीय सेवा व रोजगार महामेळावा घेण्यात आला. येथील बाजार समितीच्या आवारात झालेल्या या महामेळाव्यात विविध शासकीय विभागांतर्फे योजनांची माहिती देण्यासाठी सुमारे 50 स्टॉल लावण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे होते. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील, ए.ए. शेख, जिल्हा न्यायधीश पी.बी. गायवाड, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, जिल्हा सरकारी वकील सुशील पंडित, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी महारू पाटील, तहसीलदार मनोज खैरनार, गटविकास अधिकारी श्रीराम कागणे, नायब तहसीलदार डॉ.उल्हास देवरे, वाय.डी. पटेल, वकील संघाचे अध्यक्ष एम.एन. पाटील आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून महामेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.या वेळी जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी म्हणाले की, न्याय मिळविण्यासाठी न्यायालये आहेत. सद्यस्थितीत न्यायालयांमध्ये अनेक खटले प्रलंबित आहेत. या खटल्यांची संख्या वाढू नये म्हणून लहान तंटे गावपातळीवर मिटवले गेले पाहिजे. त्यासाठी शासनाने गाव पातळीवर तंटामुक्त समिती स्थापन केल्या आहेत. शासकीय योजनांची गाव पातळीर्पयत माहिती नसल्याने या योजना प्रभावीपणे राबविण्यास अडचण येते. मात्र शासकीय योजनांची माहिती जनतेर्पयत पोहोचविण्यासाठी वृत्तपत्रे मोठी भूमिका बजावत आहेत. शासनाच्या सर्वच योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सामाजिक संस्था व लोकांचा सहभाग असावा. जलयुक्त शिवार, पाणी अडवा-पाणी जिरवा योजनांसाठी ग्रामपंचायतींची मोठी जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.केंद्र व राज्य शासनाने आखून दिलेल्या विविध योजनांची माहिती पात्र लाभार्थीर्पयत पोहोचली पाहिजे हा मूळ उद्देश कार्यशाळेचा असल्याचे जिल्हा व सत्र न्यायाधीश वाघवसे यांनी सांगितले. प्रास्ताविक तहसीलदार मनोज खैरनार यांनी केले. सूत्रसंचालन आशा सोनवणे यांनी तर आभार अॅड.सुशील पंडित यांनी मानले.
शहाद्यात 50 स्टॉलद्वारे योजनांची जनजागृती : महाराजस्व अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:36 PM