लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 27 : सोशल मिडियाच्या माध्यमातून तरुणी व महिलांवर होणा:या अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पाश्र्वभुमिवर पोलीस दलातर्फे 1 ते 8 मार्च दरम्यान जागृती सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या दरम्यान, तरुणी, महिला यांना सोशल मिडियासंदर्भात विविध बाबींचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अशा प्रकारचा सप्ताह आयोजित करणारे नंदुरबार पोलीस दल हे राज्यातील पहिलेच ठरणार आहे.गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअप, फेसबूक, इन्स्टाग्राम, रोपोसो यासह सोशल मिडियाच्या इतर माध्यमातून तरुणी व महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. सायबर क्राईम अंतर्गत अनेक गुन्हे देखील दाखल होत आहे. एक सामाजिक चिंतेची बाब म्हणून याकडे पाहिले जात आहे. ही बाब लक्षात घेता पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी यंदाचा महिला दिन एक अनोख्या पद्धतीने साजरा करण्यासंदर्भात ठरविले आहे. जिल्हा सत्र न्यायाधिश अभय वाघवसे, जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांच्याशी चर्चा करून संजय पाटील यांनी या उपक्रमाचे नियोजन केले आहे. 1 ते 8 मार्च दरम्यान जिल्हाभरात हा उपक्रम राबविला जाणार आहे. यात केवळ तरुणी आणि महिला यांना प्रबोधनपर विविध बाबींची माहिती दिली जाणार आहे.नंदुरबार जिल्ह्यात गेल्या वर्षभरात सोशल मिडियाच्या माध्यमातून अल्पवयीन मुली, तरुणी व महिलांवरील अत्याचाराच्या घटनांची व त्याअंतर्गत गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. मुलींना, महिलांना मैत्री करण्याच्या माध्यमातून संपर्क केला जातो. एकदा मैत्री झाली की त्या माध्यमातून संपर्क वाढवून, गोड बोलून समोरच्या व्यक्तीचे मन जिंकले जाते. त्या माध्यमातून प्रेम आणि शाररिक आकर्षण निर्माण करून तरुणी व महिलांचे शोषण केले जात असते. महिला व तरुणी देखील त्याला बळी पडतात. समोरचा कोण, कुठला, त्याचे नेचर, त्याची कौटूंबिक व गुन्हेगारी पाश्र्वभुमी न पहाता केवळ समोरच्या व्यक्तींच्या लाघवी बोलण्यावर विश्वास ठेवून महिला व तरुणी फसविल्या जातात.अशा प्रकारच्या घटना या आता सामाजिक प्रश्न म्हणून पुढे येत आहेत. अनेकांचे संसार उध्वस्त झाले. अनेकांनी बदनामीच्या भितीने आपले जीवन संपविल्याचेही समोर येत आहे. ही बाब लक्षात घेता जिल्हा पोलीस दलाने यासंदर्भातील जनजागृतीवर भर देण्याचे ठरविले आहे.अशा प्रकारचा उपक्रम राबविणारे नंदुरबार जिल्हा पोलीस दल पहिले ठरणार आहे. त्यामुळे या उपक्रमाची व्यापकता आणि गांभिर्य अधीक राहावे यासाठी पोलीस अधीक्षक संजय पाटील विविध माध्यमातून प्रयत्नशील आहेत.
सोशल मिडियाच्या गैरवापराबाबत जनजागृती सप्ताह : नंदुरबार पोलीस दल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 12:17 PM