नंदुरबार : केंद्र सरकारकडून मुदत संपलेले लर्निंग लायसन्स, फिटनेस प्रमाणपत्र आणि वाहनाची पासिंग करण्याची मुदत ही ३० सप्टेंबरपर्यंतच दिली आहे. त्यामुळे आरटीओकडून कोटा सिस्टीमने चालवण्यात येणाऱ्या कामकाजाला ब्रेक लागून सामान्य नागरिक अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात नुकतेच लर्निंग लायसन्सचे कॅम्प तालुकानिहाय सुरू करण्यात आले आहेत. हे कॅम्प अद्याप पूर्णपणे वेगातही आलेले नाहीत. कोटा पद्धतीनुसार दिवसाला ५० जणांचे अर्जच मंजूर होत असल्याने बाकीच्या अर्जांच्या कामकाजाचे काय, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान नंदुरबार उपप्रादेशिक परिहवन कार्यालयाने कामे सुरळीतपणे सुरू असल्याचे सांगितले असून शासन लवकरच कोटा वाढवून देणार असल्याची माहिती दिली आहे; परंतु ज्यांचे लर्निंग लायसन्स रद्द होण्याच्या स्थितीत आहे त्यांचे काय, याचे उत्तर मात्र विभागाने दिलेले नाही. दरम्यान, वाहन फिटनेस प्रमाणपत्रेही वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.
ह्या आहेत अडचणी?
नंदुरबार आरटीओ कार्यालयात गेल्या काही दिवसांत बाहेरून आलेले सायबर कॅफेचालक लर्निंग लायसन्सच्या कामासाठी ५०० रुपयांची मागणी करण्याचे प्रकार वाढले आहेत.
पैशांची मागणी करणारे रितसर कार्यालयात फिरत असून त्यांच्याकडून आरटीओचे रजिस्टर सांभाळले जात असल्याचे दिसून आले आहे.
पंटरांमुळे नागरिक त्रस्त
आरटीओ कार्यालयात गेल्या काही दिवसांपासून अचानक उगवलेल्या पंटरांमुळे आर्थिक देवाण-घेवाण वाढली आहे. दुसरीकडे ज्यांना ॲपवरून अपाॅईंटमेंट दिली गेली आहे. त्यांच्यापर्यंत योग्यवेळी माहिती पोहाेचत नसल्याने ते उशिराने आल्यास त्यांना परतावून लावले जात आहे.
रोजचा कोटा २००
उपप्रादेशिक कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार जिल्ह्याचा कोटा २०० असून ऑनलाईन पद्धतीने दैनंदिन अर्ज प्राप्त झाल्यानंतर कामकाज होत आहे. शासनाकडून या कामांसाठी डिसेंबरपर्यंत मुदतवाढ झाल्याचेही सांगण्यात आले आहे. त्यानुसार कामकाज सुरू असून पक्के लायसन्स वितरणही सुुरू आहे.
केंद्र सरकारकडून कोटा वाढविला जातो. ३० सप्टेंबरची मुदत असली तरी येत्याकाळात मुदतवाढ मिळण्याचे संकेत आहेत. आरटीओचे कामकाज जिल्ह्यात सध्या तरी सुरळीत सुरू आहेत.
-उत्तमराव जाधव,
सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नंदुरबार.
लर्निंग लायसन्स काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अचानक काहींनी संपर्क करत पैशांची मागणी केली होती. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे.
- अर्जदार, लर्निंग लायसन्स.