आदिवासी होळीचे पूजन करीत, एका घावात दांडा तोडत राहुल गांधींनी जिंकली आदिवासींची मनं
By मनोज शेलार | Published: March 12, 2024 06:50 PM2024-03-12T18:50:36+5:302024-03-12T18:51:26+5:30
भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त खासदार राहुल गांधी मंगळवारी नंदुरबारात आले होते.
नंदुरबार : आदिवासींच्या पारंपारिक होळीत देशातील हुकूमशाही सरकार जाऊन काँग्रेसचे राज्य येऊ द्यावे अशी प्रार्थना करीत होळीचे पूजन करून फेर धरून नाचत आणि होळीचा दांडा तोडून खासदार राहुल गांधी यांनी आदिवासी न्याय होळीत सहभाग घेतला.
भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त खासदार राहुल गांधी मंगळवारी नंदुरबारात आले होते. सभास्थानी आल्यावर ते थेट त्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या होळीच्या ठिकाणी पोहचले. पारंपारिक वेशभूषा केलेले बुध्या, बावा, मोरखी यांच्याशी त्यांनी संवाद साधला. तयार करण्यात आलेल्या पारंपारिक होळीचे त्यांनी पूजन केले. होळीचा उंच दांडा पाहून आश्चर्याचा भाव चेहऱ्यावर आणत त्यांनी दांडा एवढा उंच कसा आणि कुठून आणला जातो याबाबत आमदार के.सी.पाडवी यांना विचारणा केली. होळी प्रज्वलीत केल्यानंतर त्यांनी त्या भोवती फेरी मारून व्यासपीठाकडे प्रस्थान केले.
व्यासपीठावर त्यांचे स्वागत झाल्यानंतर होळीसंदर्भात आमदार के.सी.पाडवी यांनी मनोगत व्यक्त केले. तोपर्यंत इकडे होळी पुर्णपणे प्रज्वलीत झालेले होती. होळीचा दांडा पडल्यानंतर तो तोडला जातो आणि तोडलेला दांडा झेलण्यासाठी गेल्या वर्षी ज्यांनी मानता केलेली असते ते तेथे उपस्थितीत असतात. दांडा हा एकाच फटक्यात तोडला जाने अपेक्षीत असते. त्यानुसार खासदार राहूल गांधी यांनी लोखंडी धाऱ्याने एकाच फटक्यात दांडा तोडला आणि तो मानता केलेल्या एकाने झेलला. तोच दांडा नंतर प्रसाद म्हणून खासदार राहूल गांधी यांना व्यासपीठावर देण्यात आला.
सभेतील आपल्या भाषणात खासदार राहुल गांधी यांनी होळी मातेकडे आपण आदिवासींना न्याय देणारे कॉंग्रेसचे सरकार यावे आणि हुकूमाशाहीचे सरकारी हद्दपार व्हावे अशी प्रार्थना करीत आदिवासींना न्याय आणि त्यांचे हक्क मिळावे यासाठी काम करण्यास आपल्याला हिंमत मिळावी अशी प्रार्थना केल्याचे सांगून उपस्थितांच्या हृदयाला व भावनेला त्यांनी हात घातला.
होळीच्या पारंपारिक नृत्यासाठी अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील अनेक गावातून नृत्य पथके दाखल झाली होती. त्यापैकी एका नृत्य पथकाच्या महिला सविता पाडवी यांनी सांगितले, खासदार राहूल गांधी यांना अगदी जवळून पहाण्याची संधी मिळाली. त्यांचे व्यक्तीत्व आणि बोलण्यात असलेला आपलेपणा यामुळे आपण व आपल्यासोबत असलेल्या पथकातील मुली भारावून गेल्याचे सविता पाडवी यांनी सांगितले. आदिवासींच्या पारंपारिक आणि महत्वाच्या सण व उत्सवात खासदार राहूल गांधी यांनी सहभागी होऊन आमच्या आनंदात आणि उत्साहात भर घातल्याचे यावेळी उपस्थित मुलींनी सांगितले.