भारत जोडो न्याय यात्रेअंतर्गत नंदुरबारात राहुल गांधीची मंगळवारी जाहीर सभा
By मनोज शेलार | Published: March 10, 2024 08:29 PM2024-03-10T20:29:53+5:302024-03-10T20:30:17+5:30
मनोज शेलार/ नंदुरबार : खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मंगळवार, १२ मार्च रोजी जिल्ह्यात प्रवेश करणार ...
मनोज शेलार/ नंदुरबार : खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मंगळवार, १२ मार्च रोजी जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. स्वत: खासदार गांधी हे थेट हेलिकॉप्टरने नंदुरबारात दाखल होतील. तेथून ते सभास्थानी जाणार आहेत. नंदुरबारात अवघा दोन तासांचा कार्यक्रम होणार असून नंतर ते दोंडाईचाकडे रवाना होणार आहेत. दरम्यान, यात्रेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे केंद्रीय व राज्य नेते नंदुरबारात दाखल झाले आहेत.
भारत जोडो न्याय यात्रा मंगळवारी सोनगड (गुजरात)मधून जिल्ह्यात सकाळी दाखल होईल. यात्रा थेट नंदुरबारात येणार आहे. गावागावात स्वागत झाल्यानंतर यात्रा १२ वाजता नंदुरबारात येईल. दुपारी साडेबारा वाजता खासदार राहुल गांधी हे सुरत येथून हेलिकॉप्टरने नंदुरबारात दाखल होतील. वळण रस्त्याने ते थेट सी.बी. मैदानावरील सभेत येतील.
या दरम्यान त्यांचा रोड शो करायचा किंवा कसा याबाबत सोमवारी निर्णय घेतला जाणार आहे. सभास्थळी गुजरात काँग्रेस कमिटीकडून महाराष्ट्र काँग्रेस कमिटी यात्रेतील पक्षाचा ध्वज स्वीकारेल. त्याला फ्लॅग सेरेमनी असे म्हटले जाते. त्यानंतर खासदार राहुल गांधी हे १० ते १५ मिनिटे उपस्थितांना संबोधतील. नंदुरबारातील कार्यक्रम हा अवघा दीड ते दोन तासांचा राहणार आहे. साधारणत: दोन वाजता यात्रा व नेते मंडळी ही दोंडाईचाकडे प्रस्थान करतील, असे आमदार के.सी. पाडवी यांनी सांगितले.
दरम्यान, रविवारी खासदार राहुल गांधी यांचे खाजगी सचिव बैजू, भारत जोडो न्याय यात्रेचे समन्वयक एम. संदीप, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी सभास्थळाची पाहणी केली. सोमवारी सकाळी काँग्रेसचे राज्याचे प्रभारी एम. चेन्नीथला, खासदार जयराम रमेश, खासदार के.सी. वेणूगोपाल, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार नाना पटोले, ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदी नेते नंदुरबारात दाखल होणार आहेत.