लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : नैसर्गिक फळे-फुलांच्या दृष्टीने समृद्ध असलेल्या सातपुडय़ात सिताफळांचा सुगंध दस:यापासूनच दरवळू लागला. तर काही दिवसांपासून सिताफळ बाजारपेठेत विक्रीसाठीही दाखल होत आहे. धडगाव बाजारपेठेत सिताफळाच्या प्रमाणात वाढ झाली असून ही फळे चवदार तथा वाजवी दरात उपलब्ध होत आहे. त्यामुळे अन्य फळांच्या मागणीवर परिणाम होत आहे.सातपुडय़ात अनेक पौष्टीक फळे मिळत असले तरी आंबा व सिताफळ अशी ठराविक फळे विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल होतात. उन्हाळा तथा पावसाळ्याच्या पूर्वार्धातील आंबा उत्पादनानंतर धडगाव बाजारपेठेत कुठलेही फळे विक्रीसाठी दाखल झाली नव्हती, त्यामुळे यंदा दाखल होणारे सिताफळे या वर्षातील पहिलीच फळे ठरत आहे. धडगाव-मोलगी परिसरातील उपलब्ध होणारे सिताफळ एक पीक असले तरी त्यांची कुठलीही शेती केली जात नाही, किंवा सिताफळाचे झाडेही लावली जात नाही. प्रामुख्याने खाजगी क्षेत्रातील जंगलातच ते उपलब्ध होत आहे. तर काही प्रमाणात वनक्षेत्रातूनही उपलब्ध होत आहे. धडगाव तालुक्यात अस्तंबा पर्वत भागात काकरपाटी, पाडली, चित्तार, पिंपळबारी, चांदसैली, कालीबेल, सिसा, असली तर कात्री, कुंडल, खडक्या, वरखेडी, मनवाणी, राणीकलम, चोंदवाडे, बिलबारा, कात्रा, सिंदवाणी, खरवड, खामला, मक्तरङिारा, काकरदा, गोरंबा, केलापाणी या भागात सर्वाधिक सिताफळाची झाडे आढळून येतात. या भागापैकी अस्तंबा पर्वत भागातून सर्वाधिक सिताफळे धडगाव येथे विक्रीसाठी दाखल होत आहे. जंगलातील असल्यामुळे या सिताफळांना त्या भागात रानमेवा देखीलही म्हटले जात आहे. ही सिताफळे चवदार शिवाय वाजवी दरात उपलब्ध होत आहे. त्यामुळे धडगाव बाजारपेठेतील अन्य फळांच्या मागणीत घट होत आहे. फळे जसजशी परिपक्वहोत आहेत, तसे बाजारपेठेसह तेथील काही मुख्य रस्त्यांवरही सिताफळे उपलब्ध होऊ लागली आहे. सद्यस्थितीत धडगाव व मोलगी या दोन ठिकाणीच सातपुडय़ातील सिताफळ उपलब्ध होत आहे. परंतु येत्या दहा दिवसात तळोद्यात देखील ही सिताफळे दाखल होणार आहे. तर काही शेतकरी नंदुरबारात मुक्कामी राहून सिताफळ विक्रीसाठी नियोजन करीत आहे. त्यामुळे तळोदापाठोपाठ नंदुरबारातील ग्राहकांना देखील लवकरच सातपुडय़ातील रानमेवा उपलब्ध होणार आहे.
सातपुडय़ात सर्वाधिक शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे पावसाळ्यातील शेतीची कामे तातडीने आटोपून तेथील नागरिक रोजगारासाठी स्थलांतर करीत आहे. स्थलांतर सुरू असतानाच सिताफळाचा हंगाम देखील सुरू झाल्यामुळे यातून बहुतांश नागरिकांना रोजगार उपलब्ध होत आहे. या भागातून स्थलांतर होत असले तरी स्थलांतराचे प्रमाण कमी दिसून येत आहे. मात्र सिताफळाचा हंगाम संपताच पुन्हा प्रमाण वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.सिताफळ हे नगदी पीक म्हटले जाते शिवाय याचे उत्पादन शेतातूनच घेतले जात असले तरी सातपुडय़ात मात्र या पिकाची कुठलीही शेती आढळून येत नाही. तसेच सिताफळाची झाडे लावली जात नसून ते नैसर्गिकरित्या उगलेले आहे. परंतु ज्या शेतक:यांच्या हद्दीत सिताफळाची झाडे येतात. त्या झाडांपासून मिळणारे उत्पादन हे तोच शेतकरी घेत असतो. धडगाव व मोलगी बाजारपेठेत सिताफळाच्या बी देखील विकले जात आहे. हे बी 10 ते 12 रुपये प्रती किलो प्रमाणे विकले जात आहे. त्यामुळे यातूनही तेथील नागरिकांचे आर्थाजन होत आहे.