लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राह्मणपुरी : नवीन स्वस्त धान्य दुकान मंजुरीचा आराखडा अंतिम होईपर्यंत राज्यातील शहरी भागात नवीन स्वस्त धान्य दुकान मंजुरीला १३ डिसेंबर २०१८ रोजी स्थगिती देण्यात आली होती. ही स्थगिती आता उठविण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात रेशन धान्य दुकानांची संख्या आता वाढणार आहे. यासंदर्भात नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात तालुकानिहाय तर शहरी भागातील काही कारणास्तव बंद करण्यात आलेल्या स्वस्त धान्य दुकानाचा जाहीरनामा काढून प्रस्ताव मागविण्यात आला आहे.
सातपुड्यातील एका रेशन दुकानाला जवळपासच्या पाच ते सहा गावातील लाभार्थी जोडले गेले आहेत. धान्य आणण्यासाठी दुसऱ्या गावाला जावेच लागते. अशातच जवळपासच्या गावातील स्वस्त धान्य दुकाने काही कारणास्तव बंद करण्यात आल्याने ही दुकाने दुसऱ्या गावाच्या दुकानाला जोडली गेली आहेत. त्यासाठी नागरिकांना पुन्हा १० ते १५ किलोमीटरची पायपीट करून रेशन आणावे लागत होते. एवढे अंतर चालून जाण्यापेक्षा काही लाभार्थी धान्य आणत नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना हक्काच्या धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन ज्या गावचे रेशन दुकान बंद पडले आहे, ते दुकान चालविण्यासाठी महिला बचत गट, संस्था यांच्याकडून अर्ज मागविण्यात आले असून, जिल्ह्यात एकूण ४१ गावांसाठी जाहीरनामा काढून अर्ज मागविण्यात आले आहेत. काही गावांतील बचत गटांसाठी मोठी स्पर्धा असल्याचे दिसून येते.
काय आहेत अडचणी
एखाद्या रेशन दुकानदाराने राजीनामा दिल्यानंतर तीन महिन्यांच्या आत दुसऱ्या दुकानदाराची नियुक्ती होणे आवश्यक आहे; मात्र पुरवठा विभागाने नवीन दुकानदारांच्या नियुक्तीसाठी प्रक्रियाच पार पाडली नाही. त्यामुळे काही दुकाने अनेक वर्षांपासून दुसऱ्या दुकानांना जोडण्यात आली होती. नागरिकांना १० ते १२ किलोमीटर अंतरावरून धान्य आणावे लागत होते.
सातपुड्यातील अनेक गावे अजूनही बारमाही रस्त्यांनी जोडण्यात आली नाहीत. पावसाळ्यात या गावांचा संपर्कच तुटतो. त्यामुळे गावात जड वाहन नेणे शक्य नाही.
मात्र, दुसऱ्या गावाला रेशन दुकान जोडलेले गाव लाभार्थ्याच्या गावापासून बरेच दूर राहते. पावसाळ्यात या गावालाही पोहोचणे कठीण होते. अशावेळी लाभार्थी त्या गावी जाऊन धान्य आणत नाही; मात्र उपासमारीचा सामना करतात.
कोठे किती वाढणार
नंदुरबार तालुक्यातील गावे : बामडोद, कलमाडी, मांजरे, खोंडामळी, काळंबा, शिरवाडे, ओझर्डे
नवापूर तालुक्यात - देवळीपाडा, चिंचपाडा, बेडकीपाडा, बिलदा, खोलघर, पांचबा, पळसून, पालीपाडा, बालअमराई, रायपूर, कोंकणीपाडा, नावापाडा(घनराट), चिमणीपाडा, जामतलाव.
अक्कलकुवा तालुका -वडली, ग्यलोपाडा, खटकुवा, जुना नागरमुठा, खेडले, नवागाव, लाखापूर रे,
अक्राणी तालुका : वेलखेडी, बिलगाव, कुवरखेत, चोंदवाडे खु, अस्तंभा रे, आचपा, चोचकाठी, भोंगवाडे बु,
शहादा तालुका - कमखेडा, हिंगणी, शिरूड त.ह. दोंदवाडे, चिखली खु.
राज्याच्या नागरी अन्न पुरवठा विभागाकडून नव्या रेशन दुकानांना मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात काही कारणास्तव बंद असलेल्या रेशन धान्य दुकानांना नव्याने सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे. त्यासाठी ४१ दुकानांसाठी जाहीरनामे काढण्यात आले आहेत. - महेश शेलार, जिल्हा पुरवठा अधिकारी, नंदुरबार
जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांची संख्या -
१०६४
शहरी : ९८४
ग्रामीण : ८०