लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी रवींद्र अशोक पवार यांची निवड करण्यात आली. गुरुवारी झालेल्या विशेष सभेत ही निवड जाहिर करण्यात आली. यावेळी सत्ताधार काँग्रेस गटातर्फे दोघांची, तर विरोधीपक्ष भाजपकडून एक अशा तिघांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली.पालिकेच्या अटलबिहारी वाजपेयी सभागृहात सकाळी ११ वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मावळत्या उपनगराध्यक्ष भारती राजपूत यांचा एक वर्षाचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने उपनगराध्यक्ष पदाचा निवड कार्यक्रम घेण्यात आला. यात सत्ताधारी काँग्रेस पक्षातर्फे नगरसेवक रवींद्र अशोक पवार यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला होता. मुदतीअंति एकही अर्ज दाखल न झाल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. दरम्यान, विरोधीपक्ष असलेल्या भाजपने या निवडणूक प्रक्रियेवर बहिष्कार टाकला होता. निवडप्रक्रिया सुरू झाल्यानंतर भाजपचे सर्व नगरसेवक हे सभागृहाबाहेर थांबून होते. निवडून आलेले उपनगराध्यक्ष रवींद्र पवार यांच्या नामनिर्देशन पत्रावर सूचक म्हणून नगरसेवक कुणाल वसावे, तर अनुमोदक म्हणून जागृती सोनार यांनी सह्या केल्या. सभेच्या अध्यक्षा नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी या हाेत्या. पीठासीन अधिकारी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी कामकाज पाहिले. नगरपालिकेत निवडून आलेल्या सदस्यांच्या १० टक्के अर्थात चार सदस्य स्वीकृत म्हणून निवडून देण्याची मुभा आहे. गेल्या वर्षी निवडण्यात आलेल्या नगरसेवकांची मुदत संपल्यानंतर ही पदे रिक्त झाली होती. यातून निवड प्रक्रियेत नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांनी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भारुड यांच्याकडे हलवाई शेख हारुण अब्दुल रशिद, सुनील प्रल्हाद सोनार व योगेश संजय चाैधरी यांचे अर्ज सादर केले होते. दरम्यान, शेख हारुण हलवाई व सुनील प्रल्हाद सोनार यांचे अर्ज वैध ठरवण्यात येऊन त्यांनी स्वीकृत नगरसेवक म्हणून घोषित करण्यात आले. विरोधी गटाकडून पृथ्वीराज चंपालाल जैन यांचे स्वीकृत नगरसेवक म्हणून नामनिर्देशन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले होते. त्यांचा अर्ज वैध ठरला होता. विशेष सभेत त्यांनाही स्वीकृत नगरसेवक म्हणून घोषित करण्यात आले. निवडप्रसंगी भाजप व काँग्रेस कार्यकर्ते सभागृहाबाहेर थांबून असल्याचे दिसून आले. उपनगराध्यक्ष म्हणून निवड झालेल्या रवींद्र पवार यांची काँग्रेस नगरसेवक व समर्थकांनी आमदार कार्यालयापर्यंत ढोल-ताशांच्या गजरात शेाभायात्रा काढली होती.
काँग्रेस गटातर्फे देण्यात आलेल्या तिघांच्या अर्जांपैकी दोन अर्ज वैध तर एक अवैध झाला. कागदपत्रांअभावी सादर करण्यात आलेला योगेश चाैधरी यांचा अर्ज बाद झाला. यामुळे स्वीकृत नगरसेवकाचे एक रिक्त राहिले असून, पालिकेने प्रशासनाकडे प्रस्ताव दिल्यानंतर येत्या काळात या जागेचा फेरनिवडणूक कार्यक्रम लागू करण्यात येणार आहे.