नंदुरबार : कोरोनामुक्त झालेल्या जिल्ह्यात गेल्या १७ दिवसांत सात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. गणेशोत्सवात झालेली गर्दी आणि विविध निर्बंध शिथिल झाल्याने रुग्ण संख्या वाढू लागली आहे. गेल्या तीन दिवसात चार रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना चाचण्या वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्यादृष्टीने आरोग्य विभागाने तयारी सुरू केली आहे. जिल्हा रुग्णालयात देखील कोरोना उपचार कक्ष सुसज्ज करण्यात येत आहे.
कोरोना पुन्हा डोके वर काढू लागला आहे. ऑगस्ट महिना थोडाफार दिलासादायक ठरला होता. सलग १५ दिवस या महिन्यात रुग्ण आढळून आले नव्हते. मात्र सप्टेंबर महिन्यात विविध सण उत्सव आणि शासनाने निर्बंध शिथिल केल्याने कोरोनाचा विषाणू पुन्हा सक्रिय झाला आहे. वास्तविक या काळात सर्वाधिक व्हायरल इन्फेक्शन झाले होते. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी आदी प्रकारचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढले होते. नेमके त्याचवेळी कोरोना चाचण्या अवघ्या १०० ते १५० करण्यात येत होत्या.
१७ दिवसांत सात रुग्ण
जिल्ह्यात गेल्या १७ दिवसांत सात रुग्ण आढळून आले आहेत. त्यात केवळ नंदुरबारातील पाच रुग्णांचा समावेश असून इतर दोन रुग्ण हे तळोदा व नवापूर तालुक्यातील आहेत. यामुळे नंदुरबार शहर व तालुक्यात विशेष दक्षता घेणे गरजेेचे ठरणार आहे. एकूण सात रुग्णांमध्ये तीन रुग्ण हे ग्रामीण भागातील तर चार रुग्ण शहरी भागातील आहेत.
रुग्ण साखळी शोधावी
कोरोना रुग्ण आढळून आलेल्यांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेणे गरजेचे आहे. परंतु रुग्ण साखळी शोधण्याबाबत फारशी दक्षता घेतली जात नसल्याचे चित्र आहे. तसे झाल्यास कोरोनाचा फैलाव झपाट्याने होऊन पुन्हा कोरोनाचा विळखा वाढेल असे बोलले जात आहे. याबाबत आरोग्य विभागाने दक्षता घेऊन उपाययोजना कराव्या अशी मागणी करण्यात येत आहे.
सण-उत्सवांमधील बेफिकिरपणा
सण व उत्सवांमधील बेफिकिरीने आता नागरिकांच्या जिवावर उठला आहे. गणेशोत्सव काळात गर्दी करू नये, साध्या पद्धतीने उत्सव साजरा करावा, घरच्या घरी विसर्जन करावे असे आवाहन प्रशासनाने केले असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून नागरिकांनी नियम आणि सूचनांना केराची टोपली दाखवली होती. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यामुळे यापुढील काळात तरी किमान नियम व सूचनांचे पालन करून नागरिकांनी स्वत: खबरदारी घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
n गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून कोरोना चाचण्या कमी झाल्या आहेत. त्यामुळे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण देखील कमी आहे. जर चाचण्या वाढविल्या तर रुग्ण संख्या देखील वाढू शकते. सद्य स्थितीत दोनच ठिकाणी स्वॅब संकलन सुरू असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
n सद्यस्थितीत आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात आहेत. रॅपिड ॲंटिजन चाचण्या होत नसल्याची स्थिती आहे. पूर्वीप्रमाणे रॅपिड चाचण्यांची सोय नंदुरबार, शहादा, नवापूर या शहरांमध्ये काही ठिकाणी केली तर ते नागरिकांच्या दृष्टीने सोयीचे ठरणार आहे.
n जिल्हा रुग्णालयात असलेल्या कोविड उपचार कक्षात देखील रुग्ण नसल्याने त्या ठिकाणचे कर्मचारी इतर ठिकाणी वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे आता हा कक्ष देखील आवश्यक त्या सुविधांसह सज्ज ठेवणे आवश्यक असून डाॅक्टर व कर्मचारी यांची देखील नियुक्ती करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.