लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ युतीच्या वाटय़ात शिवसेनेला आला असला तरी येथे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने युतीसाठी डोकेदुखी ठरली आहे.अक्कलकुवा मतदारसंघात शिवसेनेतर्फे आमशा पाडवी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. विशेष म्हणजे त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर यापूर्वी राष्ट्रवादीतून उमेदवारीसाठी भाजपमध्ये प्रवेश केलेले कार्यकर्ते विजयसिंग पराडके व किरसिंग वसावे यांनी भाजपमधून पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला होता. सध्या या दोघांनीही अपक्ष म्हणून अर्ज भरले असले तरी ते माघारीर्पयत मागे घेतील, असे चित्र आहे. मात्र भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व प्रदेश कार्यकारिणी सदस्य नागेश पाडवी यांनी पक्षावर नाराजी व्यक्त करीत उमेदवारी अर्ज भरला आहे. हा अर्ज भरताना त्यांनी भाजपचे ङोंडे, बॅनरसह भव्य रॅली काढली होती. नागेश पाडवी हे माजी मंत्री स्व.दिलवरसिंग पाडवी यांचे पुत्र आहेत. गेल्या निवडणुकीत ते याठिकाणी भाजपतर्फे उमेदवार होते. आता मात्र अपक्ष म्हणून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने पक्षाचे त्यांच्या माघारीसाठी प्रयत्न सुरू आहेत. तथापि, त्यांची नाराजी अद्याप तरी दूर झाली नसल्याने या मतदारसंघात बंडखोरी रोखण्यासाठी युतीपुढे आव्हान ठरले आहे. शनिवारी जलसंपदामंत्री गिरीश महाजन नंदुरबारात आले होते. त्यांनी भाजपच्या ठराविक कार्यकत्र्याची बैठक घेऊन काही कानमंत्र दिले. त्यात बंडखोरीबाबतही चर्चा झाल्याचे वृत्त आहे.
अक्कलकुवा मतदारसंघात भाजपचे नागेश पाडवी यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे. त्यांनी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष व नेत्यांना कळविले आहे. त्यांचेही प्रयत्न सुरू आहेत. माघारीसाठी 7 ऑक्टोबर्पयत मुदत असून तोर्पयत त्यांचे मन वळविण्यात निश्चित यश येईल.-डॉ.विक्रांत मोरे, शिवसेना, जिल्हा प्रमुख.