मनोज शेलार
नंदुरबार : ग्रामपंचायत निवडणूक कामकाज करण्यास टाळाटाळ करणाऱ्या मंडळ कृषी अधिकारी यांच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नायब तहसीलदार यांनी फिर्याद दिली आहे.उमेश जगतराव भंदाणे, मंडळ कृषी अधिकारी नंदुरबार असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. नंदुरबार तालुक्यात ७५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे कामकाज सुरू आहे. त्यासाठी विविध अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. भदाणे यांच्याकडे नागसर, श्रीरामपूर, खामगाव या ग्रामपंचायतींची जबाबदारी देण्यात आली होती. त्यासाठी त्यांच्याशी वारंवार संपर्क करून देखील त्यांनी निवडणूक कामकाज सांभाळण्यासाठी दुर्लक्ष केले. गुरुवार, १ सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपून देखील त्यांनी निवडणूक कामकाज सांभाळले नाही. त्यामुळे महसूल प्रशासनाने निवडणूक अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मार्गदर्शन मागविले. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
याबाबत नंदुरबारचे नायब तहसीलदार भिमराव ओंकार बोरसे यांनी नंदुरबार शहर पोलिसात याबाबत फिर्याद दिली. त्यावरून कृषी मंडळ अधिकारी उमेश भदाणे यांच्याविरुद्ध सरकारी काम करण्यास टाळाटाळ करून राज्य निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार देविदास सोनवणे करीत आहे.