लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कर्नाटक राज्याने भाषा, साहित्य व संस्कृतीवर आठ कोटी रुपये अनुदान दिले तर आपल्या राज्यात अजूनही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला केवळ 25 लाखांचे अनुदान आहे. त्यामुळे शासनाचीच याबाबत मोठी अनास्था असल्याची खंत अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाद जोशी यांनी साहित्य संमेलनात व्यक्त केली.तळोदा येथील महाविद्यालयात रविवारी नंदुरबार जिल्हा साहित्य अकादमी व आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार जिल्हा आठवे साहित्य संमेलन झाले. त्यावेळी डॉ.श्रीपाद जोशी बोलत होते. अध्यक्षस्थानी निंबाजीराव बागुल तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डॉ.पीतांबर सरोदे, राजेंद्रकुमार गावीत, वाहरू सोनवणे, विदर्भ साहित्य संघाचे प्रदीप मोहिते, महामंडळाचे कार्याध्यक्ष विलास देशपांडे, रमाकांत पाटील, अविनाश पाटील, राजू पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव उपस्थित होते. डॉ.जोशी म्हणाले, आपला देश पारंपारिक, बहुभाषिक व आदिवासी जाती-जमातींचा आहे. त्यामुळे भाषा व संस्कृतीला खूप महत्त्व आहे. मात्र शासनाच्या उदासिन धोरणामुळे सध्या त्याच्यावर मोठा आघात होत आहे. वास्तविक साहित्य व संस्कृतीत समाजाच्या विकासाबरोबरच देशाच्या विकासाचेही प्रतिबिंब आहे. मात्र हल्ली याबाबतच उदासिनता दिसून येत आहे. या विषयी खंत व्यक्त करून शेजारच्या कर्नाटक राज्यात सांस्कृतिक मंडळाला तब्बल आठ कोटीचे अनुदान दिले जाते तर आपल्या राज्यात सांस्कृतिक महामंडळावर केवळ 25 लाखाचे अनुदान राखण्यात आले आहे. तेही वर्षानुवर्षे तेवढेच आहे. त्यावर अजूनही वाढ केली जात नसल्याचे त्यांनी सांगितले. राज्यकत्र्याच्या अनास्थेबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विधान परिषदेतही साहित्य क्षेत्रातील व्यक्तिंना पुरेशे प्रतिनिधीत्व दिले जात नसल्याचे सांगून याबाबत कायदेशीर लढाई लढली जात असल्याचे ते म्हणाले. साहित्याच्या क्षेत्रातही मुठभर लोकांची मक्तेदारी वाढल्यामुळे विद्रोही साहित्यिक निर्माण होत आहे. यावरही विचार झाला पाहिजे. त्याचबरोबर मराठी भाषेचा विकास करण्याऐवजी राज्यातील 80 हजार मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय शासन घेत असल्याचे त्यांनी सांगितले. साहित्य संमेलनाच्या अवस्थाबाबत डॉ.श्रीपाद जोशी म्हणाले, अगदी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीदेखील निवडणूक घेतली जाते. एवढे दुर्देव या क्षेत्रातदेखील आले आहे. भाषा व संस्कृतीमुळेच देशाचा विकास आहे आणि मुठभर लोकांच्या हाती असलेल ही मक्तेदारी मोडून काढण्यासाठी सर्वानी एकत्र येण्याचे आवाहनही शेवटी त्यांनी केले. या वेळी त्यांनी गेल्या आठ वर्षापासून जिल्हास्तरीय साहित्य संमेलने यशस्वी केले जात असल्याने साहित्य अकादमीचे कौतुक केले.या वेळी संमेलनाचे अध्यक्ष निंबाजीराव बागुल यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले, नंदुरबार जिल्ह्यातील सांस्कृतीक उत्सव व परंपरांना प्राचिन इतिहास आहे. त्यात आगळी वेगळी संस्कृती दडलेली आहे. ललित उत्सव, रासगान, गाव दिवाळी या सारख्या परंपरा येथे अस्तित्वात आहेत. त्याचबरोबर मंदिर, चैत्य, शिल्प, शिलालेख व लोकसाहित्य, लोककला यातूनही इथल्या साहित्याची जाणीव होते. साहित्यातून समाजातील रुढी, परंपरा यांचा विधायकपणे वापर करीत संस्कृतीची मांडणी केली जाते. त्यामुळेच साहित्यामुळे समाजाची प्रगती होत आहे. साहित्यात बोली भाषेला महत्त्व आहे जर बोलीभाषा नष्ट झाली तर संस्कृतीही नष्ट होईल. त्यामुळे बोलीभाषा टिकली पाहिजे. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा.पीतांबर सरोदे यांनी केला. संमेलनाची भूमिका विकास देशपांडे यांनी मांडली तर साहित्य संमेलनाची पाश्र्वभूमि संमेलनाचे स्वागताध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत यांनी मांडली. सूत्रसंचालन विकास पाटील, रजनी रघुवंशी तर आभार रमाकांत पाटील यांनी मानले.व्यासपीठावर कॉलेज ट्रस्टचे अध्यक्ष सुदाम पाटील, आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीच्या जयाबाई गावीत, साईनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.शशिकांत वाणी, प्राचार्य रामय्या, सुलभा महिरे, डॉ.राजेश वळवी, सतीष वळवी, संजय माळी, रुपसिंग पाडवी, हेमलता डामरे, प्रा.विलास डामरे, राजेंद्र राजपूत, जयसिंग माळी, जितेंद्र पाडवी, हिरामण पाडवी, नीमेश सूर्यवंशी, विनायक माळी, फुलसिंग पाडवी, प्रा.जयपाल शिंदे उपस्थित होते. तत्पूर्वी सकाळी ग्रंथ दिंडीची मिरवणूक काढण्यात आली. या ग्रंथ दिंडीचा शुभारंभ जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर ही दिंडी शेठ के.डी. हायस्कूलपासून मेनरोड, तहसील कचेरी, कॉलेज रोडमार्गे महाविद्यालयात समारोप करण्यात आला.
मराठीच्या संवर्धनाकडे शासनाचेच दुर्लक्ष, साहित्य महामंडळ अध्यक्षांची तळोद्यात खंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 5:20 PM