लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील अनेक दिग्गजांचे भवितव्य जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून मंगळवारी मतपेटीत बंद होणार आहे. यात आजी, माजी आमदारांच्या कुटूंबातील सदस्य, जिल्हा परिषदेचे माजी पदाधिकारी यांचा समावेश आहे.जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी मंगळवार, ७ जानेवारी रोजी मतदान होत आहे. यंदाच्या निवडणुकीत जिल्ह्यातील राजकीय पक्षाच्या अनेक दिग्गजांचे नातेवाईक निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांचे भवितव्य मतदान यंत्रात मंगळवारी बंद होणार आहे. दिग्गजांमध्ये प्रामुख्याने माजी मंत्री व आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांच्या पत्नी डॉ.कुमुदिनी गावीत, आदिवासी विकास मंत्री अॅड.के.सी.पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाडवी, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे पूत्र अॅड.राम रघुवंशी, अॅड.पद्माकर वळवी यांच्या कन्या अॅड.सिमा वळवी, माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांचे पूत्र दिपक व मधुकर नाईक.माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावीत यांचे पूत्र भरत गावीत व स्रूषा संगिता गावीत.माजी आमदार शरद गावीत यांच्या कन्या अर्चना व राजेर्षी गावीत, माजी आमदार नरेंद्र पाडवी यांच्या पत्नी आशा पाडवी, माजी जि.प.उपाध्यक्ष व सातपुडा कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक, शहाद्याचे नगराध्यक्ष मोतिलाल पाटील यांचे पूत्र अभिजीत पाटील यांचा समावेश आहे. या सर्वच गटांमध्ये प्रतिष्ठेच्या लढती रंगल्या आहेत. त्यामुळे या लढतींबाबत जिल्हावासीयांमध्ये प्रचंड उत्सूकता लागून आहे.
नेत्यांच्या नातेवाईक उमेदवारांचा आज फैसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2020 12:22 PM