लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : केंद्र शासनाच्या शेतकरी आणि कामगार विरोधी धोरणाचा काँग्रेसतर्फे गांधी जयंतीचे औचित्य साधून निषेध करण्यात आला. गांधींजींना आदरांजली अर्पण करून नंतर हुतात्मा स्मारकात धरणे धरण्यात आले. यावेळी पालकमंत्री अॅड.के.सी.पाडवी यांच्यासह पक्षाचे सर्व पदाधिकारी व नेते उपस्थित होते.भाजप सरकारच्या शेतकरी, कामगार कायदे व इतर धोरणांचा निषेध म्हणून गांधी जयंतीदिनी हे आंदोलन झाले. पालकमंत्री अॅड.के.सी.पाडवी, जिल्हा परिषद अध्यक्षा अॅड.सिमा वळवी, आमदार शिरिष नाईक, माजी मंत्री अॅड.पद्माकर वळवी, जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक, सुभाष पाटील, जि.प.सदस्य सी.के.पाडवी, सुहास नाईक, देवमन पवार, पंडितराव पवार, राजेंद्र पाटील, देवा चौधरी, रऊफ शाह आदींसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.मोदी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी बोलतांना पालकमंत्री अॅड.के.सी.पाडवी यांनी केंद्र सरकार हे भांडवालदारांना पाठीशी घालणारे आणि शेतकरी, कामगारांना उघड्यावर आणणारे सरकार आहे. सामान्यांच्या हिताचे कुठलेही निर्णय या सरकारने घेतले नसल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना शिष्टमंडळाने जाऊन निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, मोदी सरकारने शेती आणि शेतकरी यांच्या विरोधात षडयंत्र रचले आहे. तीन काळ्या कायद्याच्या माध्यमातून देशातील हरीतक्रांती नष्ट करण्याचा कुटील डाव रचला आहे. जगाचा पोशिंदा, अन्नदाता शेतकरी व शेतमजूर यांना काही उद्योगपतींचे गुलाम बनविण्याचे एक मोठे षडयंत्र आहे. देशातील ६२कोटी शेतकरी, कामगार व २५० पेक्षा अधीक शेतकरी संघटना या काळ्या कायद्याच्या विरोधात आवाज उठवत आहेत. पण पंतप्रधान मोदी व त्यांचे सरकार या आवाजाकडे दुर्लक्ष करून देशाची दिशाभूल करीत आहे. शेतकऱ्यांचा आवाज ऐकणे तर दुरच शेतकºयांचे संसदेतील प्रतिनिधी असलेल्यांचा आवाजही बंद केला आहे. शेतकºयांवर लाठीमार करून त्यांना वेठीस धरले जात आहे. बहुमताच्या जोरावर तीन काळे कायदे मंजूर करून घेतले असल्याचा आरोपही या निवेदनात करण्यात आला आहे.
शेतकरी, कामगार विरोधी काळे कायदे रद्द करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2020 11:53 AM