बैठकीस आमदार डॉ. विजयकुमार गावीत, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील आदी उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना खासदार डॉ. गावीत यांनी सांगितले की, प्रधानमंत्री आवास योजनेच्या (शहरी) माध्यमातून शहर झोपडपट्टीमुक्त करण्याचा प्रयत्न करावा. जिल्ह्यात एकही व्यक्ती बेघर राहणार नाही याची दक्षता घ्यावी. घरकुलाच्या बांधकामाचा दर्जा चांगला राहील याकडेही लक्ष द्यावे. शहरी भागातील घरकुलांचे उद्दिष्ट, मंजूर घरकूल, पूर्ण व अपूर्ण घरकुलांची माहिती सादर करावी. ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकूल बांधकाम व इतर योजनांची तालुकानिहाय समिती स्थापन करून माहिती घेण्यात येईल.
तसेच महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत बचतगटाची अधिकाधिक खाती उघडण्यात येऊन तालुकास्तरावर बचतगटाचे मेळावे आयोजित करावेत. शिक्षणाचा दर्जा वाढविण्यावर भर देऊन शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत वन विभागाने जास्तीत जास्त कामे उपलब्ध करून देत स्थलांतर थांबविण्याचे प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. बैठकीत शिक्षण, आरोग्य, सिंचन तसेच केंद्र शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. बैठकीस समितीचे अशासकीय सदस्य आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.