लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरातील मुख्य रस्ते व चौकाचौकांत थांबणाऱ्या ऑटो आणि इतर प्रवासी वाहनांमुळे शहादा शहरातील वाहतुकीचा प्रश्न कायम आहे. बसस्थानक परिसर, दोंडाईचा रोड, महात्मा फुले चौक, गांधी पुतळा, जनता चौक, चार रस्ता, खेतिया रोड, शिवसेना कार्यालय, न्यायालय परिसर आदी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची समस्या आहे. विशेष करून या सर्व भागांमध्ये गोंधळाची स्थिती असून, याकडे संबंधित वाहतूक शाखेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना कमालीचा मनस्ताप होत आहे.
शहादा शहरातील बस स्थानक परिसरात बेशिस्त वाहन थाब्याने प्रवाशांची हेळसांड होत आहे. परिणामी बसस्थानकात बस चालकांना ये-जा करण्यासाठी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. बसस्थानकाबाहेर वाढलेल्या गर्दीमुळे बसचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. वाहनधारकांकडून वाहतुकीच्या नियमांचे पालन केले जात नसल्याचे समोर आले आहे. कधी राईट कधी लेफ्ट बाजूला ऑटो रिक्षा व इतर प्रवासी वाहने थांबत आहेत. पोलिसांचा धाक न बाळगता म्हणेल तिथे वाहने थांबत असल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे.
या ठिकाणी रिक्षाचालकांची मनमानी
बसस्थानक
शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात रिक्षाचालकांची मनमानी पहायला मिळत आहे. प्रवासी मिळविण्यासाठी ही स्पर्धा होत असल्याचे समोर आले आहे. प्रवासी वाहने थेट बसस्थानकात जाऊन प्रवासी मिळवत असल्याचे चित्र आहे. मात्र, प्रवाशांना व एसटी प्रशासनाला याचा त्रास सहन करावा लागत आहे.
शिवसेना कार्यालय - न्यायालय परिसरात -
शहरातील डोंगरगाव रोड भागात प्रवासी मिळविण्यासाठी प्रवासी वाहनधारकांमध्ये कमालीची स्पर्धा आहे. या भागात रस्त्याच्या मध्यभागात अस्ताव्यस्त वाहने लावत बेशिस्तपणे पार्किंग करण्याचा प्रकार पुढे आला आहे. वाहनधारकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरे जावे लागत असले तरी यांच्याकडे वाहतूक विभागाचे लक्ष कसे जात नाही असा प्रश्न निर्माण होत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते हॉटेल पटेल रेसिडेन्सीपर्यंतचा मुख्य रस्ता तर या अवैध प्रवासी वाहनांच्या अड्डा बनला आहे. कोणताही धाक न बाळगता या मुख्य रस्त्यावर रोज शेकडो वाहनांचा जमावडा असतो. या वाहनांमुळे रस्त्यावर प्रवास करणाऱ्या अनेक वाहनधारकांना रोजच अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मनमानी भाडेवाढ
टप्प्याटप्प्याने प्रवासी वाहतूक बदलली आहे. बसेस बंद असल्याने ग्रामीण भागात जाण्यासाठी प्रवाशी वाहनांनी प्रवास करावा लागत असल्याने मनमानी पद्धतीने भाडे आकारले जात आहे.
त्यातच पेट्रोल, डिझेलची होत असलेली दरवाढ ही सामान्य वाहनधारकांच्या आवाक्याबाहेर आहे.
ऑटो रिक्षा व प्रवासी वाहनांमध्ये कोणत्याही प्रकारचे भाडे ठरलेले नाही. जो तो मनमानीनुसार भाडे आकारत असल्याचा संभ्रम आहे.
नियमानुसार जेवढे अंतर आहे. तेवढेच भाडे ठरले पाहिजे व शहरात फिरणारे ऑटो व इतर वाहने हे कुठले आहेत. पासिंग झाली आहेत का. त्यांचे वय किती ते रस्त्यावर चालण्यायोग्य आहेत का, या सर्व बाबी तपासल्या पाहिजेत.