शहादा : स्वातंत्र्यानंतर तीन पिढ्यांनी तीन किलोमीटर पायी चालून शिक्षण घेत इतरत्र मार्ग धरला परंतू शासनाने रस्ता तयार करणे मनावरच घेतले नाही़ आता चौथी पिढीही त्याच खाचखळग्यातून शिक्षण घेण्यासाठी जाण्याची चिन्हे असल्याने ‘रस्ता नाही, तर मतदान नाही’ असा पवित्रा वडछील ता़ शहादा येथील ग्रामस्थांनी घेतला आहे़शहादा तालुक्याच्या पूर्व भागात साधारण १ हजार लोकवस्तीचे गाव असलेल्या वडछील येथून माध्यमिक आणि उच्च शिक्षणाची सोय नसल्याने विद्यार्थी प्राथमिक शिक्षणानंतर कहाटूळ येथे दाखल होतात़ वडछील गावापासून अवघ्या तीन किलोमीटरवर कहाटूळ असले तरी येथेपर्यंत पोहोचणे विद्यार्थ्यांसाठी मोठे दिव्यच समजले जाते़ स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सर्वत्र विकासाचा बोलबाला असताना मात्र हा तीन किलोमीटरचा रस्ता अद्यापही स्वातंत्र्यपूर्व काळातीलच आहे़ डबर आणि माती मिश्रित या रस्त्यावरुन चालताना ठेचकाळून पडणे नित्याचे होऊनही विद्यार्थी फक्त शिक्षण घेण्यासाठी मार्गावरुन चालत आहेत़ विशेष म्हणजे त्यांच्या यापूर्वीच्या तीन पिढ्यांनी याचप्रकारे शिक्षण घेतल्याने हा रस्ता त्यांच्याही अंगवळणी पडला आहे़ याबाबत पाठपुरावा करणाऱ्या ग्रामस्थांना शासनाचे विविध विभाग चमत्कारीक अशा उत्तरांची खैरात देऊन बोळवण करत आहेत़आज ना उद्या रस्ता होणार म्हणून ग्रामस्थही ‘खाचखळगे पार करत का, होईना, मुलगा-मुलगी शाळेत तर जातात ना’ अशी समजूत घालून मन शांत करत होते़ परंतू येत्या काळातही रस्ता तयार होण्याची कोणतीही कार्यवाही होणे शक्य नसल्याचे सांगण्यात आल्याने येत्या लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत सारख्या कोणत्याही निवडणूकीत मतदान न करण्याचा पवित्रा आता ग्रामस्थांनी घेतला असून येत्या १५ मार्च पर्यंत याबाबत प्रशासनाने योग्य ती कारवाई न केल्यास ग्रामस्थ शहादा प्रांतधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून दाद मागणार आहेत़ यानंतरही कार्यवाही न झाल्यास मतदान बहिष्काराला तयार रहा, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे़
शिक्षणासाठी तीन पिढ्यांची पायपीट तरीही रस्ता मातीचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 11:26 AM