लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : शेवाळी-नेत्रंग महामार्गावरील तळोदा ते गुजरात हद्दीपर्यंत नदी-नाल्यांवर असलेल्या पुलांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. महामार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. काही ठिकाणी रस्त्यावरील डांबर पूर्णपणे उखडल्याने धूळ उडत असल्याने त्याचा त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. या महामार्गावरील पूल व रस्त्याच्या दुरुस्तीसाठी २९ जानेवारी रोजी अक्कलकुवा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.तळोदा, वाण्याविहीर, अक्कलकुवा, खापर, डोडवा गुजरात हद्द दरम्यान व सोरापाडा वरखेडी नदीच्या पुलावरील, खापरजवळील नदी व पेचरीदेव नदीच्या पुलावर जागोजागी असलेल्या मोठमोठे चढउताराचे खड्डे जीवघेणे ठरत आहेत. मुरूम-माती, रेतीच्या उडणाऱ्या धुळीमुळे वाहनधारक व प्रवाशांना त्रास होत असून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. सद्यस्थितीत या महामार्गाची इतकी दुरवस्था झाली आहे की या महामार्गावरुन प्रवास करताना आपण घरी पोहोचू की नाही, अशी भीती प्रवाशांना सतावते.शेवाळी-नेत्रंग या महामार्गावरील तळोदा, सोमावल, शिर्वेफाटा, मोदलपाडा, वाण्याविहीर, राजमोई फाटा, मोलगी नाका, अक्कलकुवा, सोरापाडा, खापर, पेचरीदेव, नवापाडा ते डोडवा गुजरात हद्दीदरम्यान पावसाळ्याच्या पूर्वीपासून जागोजागी मोठमोठे खड्डे पडुन महामार्ग वाहनधारकांना त्रासदायक ठरत आहे. महामार्गावर जागोजागी असलेले मोठमोठे चढउताराचे खड्डे टाळताना अपघात होऊन जिवितहानीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. अक्कलकुवा-सोरापाडा दरम्यान वरखेडी नदीवरील पूल कमकुवत झाला असताना पावसाळ्यात आलेल्या पुरात पुलावरील दुुुतर्फा असलेले लोखंडी संरक्षण कठडे वाहून गेल्याने हा पूल अधिक धोकादायक झाला आहे. या पुलावरून शिक्षणासाठी पायी जाणाºया विद्यार्थ्यांसह महिलांना अवजड वाहतुकीचा सामना करीत जीव मुठीत धरुन मार्गक्रमण करावे लागगत आहे. महामार्गावरील अवजड वाहतूक लक्षात घेता हा पूल केव्हा कोसळेल हे सांगगता येत नाही. तळोदा ते गुजरात हद्दीपर्यंत असलेल्या सर्वच पुलांची अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे या महामार्गाची दुरूस्ती व चौपदरीकरण कामाला सुरुवात करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.दुरुस्तीसाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने २९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता अक्कलकुवा-सोरापाडा दरम्यान असलेल्या या वरखेडी नदीच्या धोकेदायक असलेल्या पुलावरच भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचे निवेदन अक्कलकुवा तहसीलदारांना देण्यात आले आहे.
तळोदा ते गुजरात हद्दीपर्यंतचा रस्ता जीवघेणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 12:58 PM