n लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : समशेरपूर कारखाना ते कोरीटनाका दरम्यान रस्ता कॅांक्रीटीकरणाचे रखडलेले काम अखेर बुधवारी पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात आले. न्यायालयाची स्थगिती उठल्याने या कामाला सुरुवात करण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून या ठिकाणी वाहनचालकांची वाहन काढण्यासाठी मोठे हाल होत होते. नंदुरबार तालुक्यातील लहान शहादे व कोरिट फाट्यावरील रस्त्याचे काम अखेर पोलिसबंदोबस्तात सुरू करण्यात आले आहे. कोळदा ते खेतिया रस्त्याचे काँक्रिटीकरण गेल्या तीन वर्षापासून सुरू आहे. त्यात कोळदा पासून तर शहादा-खेतिया पर्यंत टप्प्याटप्प्याने काम सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, लाँकडाऊन मुळे अनेक मजूर गावी परत गेल्याने रस्त्याचे काम रखडले होते. त्यात काही शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने न्यायालयाने स्थगिती दिल्याने रस्त्याचे काम बंद होते. त्यामुळे तेथे काम बंद असल्याने रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली होती. प्रचंड धूळ, अनेक वेळा अपघात घडले आहेत. अनेकांना आपला प्राण गमावावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, एक महिन्यापूर्वी न्यालयाची स्थगिती उठल्याने कामाला सुरुवात करण्यात आली. बुधवारी सकाळी तालुका पोलीस निरीक्षक अरविंद पाटील व उपनगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी लहान शहादा व कोरिट येथील शेतकऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. कामाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे.
कोरीट फाट्याजवळील रस्ता काम अखेर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 12:43 PM