लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : आतापर्यंत कोरोनापासून दुर असलेल्या शहादा शहरात एकाच वेळी दोन रूग्ण कोरोना पॉझीटीव्ह आढळून आल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वेळी नागरिकांनी घाबरून आपापले परिसर सिल करून घेतले आहेत.शहादा शहर कोरोनामुक्त असल्याने शहरात समाधानाचे वातावरण होते. मात्र मंगळवारी रात्री शहरातील दोन रूग्णांचा अहवाल पॉझीटिव्ह आल्याने शहरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. आधीच नंदुरबारला चार रूग्ण पॉझीटिव्ह असल्याने शहरात भीतीचे वातावरण होते. त्यात शहरातील दोन व अक्कलकुवा येथील एक अशा तीन रूग्णांचे अहवाल पॉझीटिव्ह आल्याने शहरातील नागरिकांमध्ये भीती वाढली आहे. प्रशासनाने याची तातडीने दखल घेत रूग्ण सापडलेल्या परिसरात औषधी फवारणी करून संपूर्ण परिसर सिल केला असला तरी घाबरलेल्या नागरिकांनी बचावासाठी आपापले परिसर सील करून घेतले आहेत.अनेक वसाहतीत नागरिकांनी मुख्य रस्त्यावर अडथळे उभे करून परिसर सिल केले आहेत. डोंगरगांव रोडवर पटेल रेसिडेन्सी चौकात रस्ता सील केल्याने डोंगरगांव रस्त्याने शहरात होणारी रहदारी ठप्प झाली आहे. प्रशासनानेदेखील खबरदारीचा उपाय म्हणून अनेक रस्ते बंद केले आहेत. शहरात ठिकठिकाणी रस्ते बंद झाल्याने शहरात सर्वत्र शुकशुकाट आहे.कोरोनाने शहरात प्रवेश केल्याने पालिका प्रशासनाने पुन्हा एकदा शहरात व शहराला लागून असलेल्या नवीन वसाहतींमध्ये औषध फवारणी करावी अशी नागरिकांची मागणी आहे. नागरिकांनी घाबरून न जाता घरातच थांबावे, विनाकारण बाहेर फिरू नये व मास्कचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
शहाद्यातील कॉलन्यांमधील रस्ते बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 12:47 PM