सातपुड्याच्या अतिदुर्गम भागातील घाट सेक्शनच्या वळणदार चढावांचा भाग असलेल्या रस्त्यांची दुरवस्था झाली असून, या रस्त्यावर आवश्यक ठिकाणी संरक्षण भिंत व संरक्षण कठडे नसल्याने रस्त्यांचा काही भाग खचला आहे. पिपरापाणी, वेरी, मोजापाडा, वेलखेडी, माकडकुंड, पळासखोब्रा, डेब्रामाळ या रस्त्यावरील वेलखेडीच्या उतार भागात व माकडकुंड व पळासखोब्रा दरम्यान रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे वेलखेडी, सुतारवाणीपाडा, बारीपाडा, उबारीपाडा, कारभारीपाडा, पळासखोब्रा, डेमरीपाडा, बुदेमालपाडा येथील वाहनधारक व प्रवाशांना धोकेदायक व त्रासदायक ठरत आहे. या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून आवश्यक ठिकाणी संरक्षण भिंत व संरक्षण कठडे उभारण्याची मागणी या परिसरातील गावपाड्यांवरील वाहनधारक व नागरिकांनी केली आहे.
अपूर्ण कामांमुळे रस्त्यांवर चिखल
या अतिदुर्गम व डोंगराळ भागातील अनेक रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत. काही रस्त्यांवर मातीकाम करण्यात आले आहे. पावसाळ्यात थोडाही पाऊस झाला की, रस्त्यांवर चिखल होतो. या चिखलातून वाहन काढताना प्रचंड कसरत करावी लागते. जास्त पाऊस झाल्यास मातीचा भराव वाहून जाऊन रस्ताच खंडित होतो. काही रस्त्यांचे काम यंदाच जून महिन्यात आले. त्यात वेलखेडी, सांबर, पळासखोब्रा, बुदेमालपाडा या रस्त्यांचे काम जून महिन्यातच झाले असताना त्यांची दुरवस्था झाली आहे. सांबरच्या बेतपाडा येथे डांबरीकरणाचे काम अपूर्णावस्थेत असल्याने पावसाळ्यात वाहनधारक व नागरिकांना ये-जा करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.