प्रकाशा : कोटय़वधी रुपये खर्च करून बांधलेल्या प्रकाशा बॅरेजची अवस्था बिकट होताना दिसत आहे. आधीच सुरक्षा रक्षकाअभावी रामभरोसे असलेला प्रकाशा बॅरेजवर गेल्या आठ महिन्यांपासून पथदिवे बंद असल्याने दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील बॅरेज पूर्ण क्षमतेने भरला असून, त्याचा फायदा प्रकाशासह 34 गावांना होत आहे. सुमारे 600 शेतक:यांनी वैयक्तिक पाणीपुरवठय़ाची परवानगी घेवून 230 हेक्टर शेतजमिनीला त्याचा फायदा होत आहे. औद्योगिक क्षेत्राला पाणी वापर म्हणून अॅस्टोरिया साखर कारखाना येथून पाणी उचलत आहे. मात्र सद्यस्थितीत कोटय़वधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या बॅरेजची अवस्था बिकट होत आहे. आधीच दहा महिन्यांपासून सुरक्षा रक्षक नसल्याने प्रकल्पाची सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यातच परिसरात व बॅरेजवर आठ महिन्यांपासून एकही पथदिवा सुरू नसल्याने सर्वत्र अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या बॅरेजवर 28 गेट असून प्रत्येक गेटवर एक पथदिवा आहे. मात्र सद्यस्थितीला हे सर्व पथदिवे बंद अवस्थेत आहेत.पथदिव्यांच्या दुरवस्थेबाबतचे पत्र 14 जून 2016 रोजी धुळे येथील तापी जलविद्युत उपसा सिंचन विभाग क्रमांक दोन यांना पाठविण्यात आले आहे. मात्र आठ महिने होऊनदेखील त्याची दखल संबंधित विभागाने घेतली नसल्याने संबंधित अधिकारी किती तत्परतेने काम करीत आहेत हे दिसून येते. त्यामुळे संबंधित वरिष्ठ अधिका:यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)तापी जलविद्युत उपसा सिंचन उपविभाग क्रमांक एक यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, मी नोव्हेंबर 2015 पासून कार्यरत झालो असून, तेव्हापासून देखभाल व दुरुस्तीसाठी निधी मिळलेला नाही. निधी मिळावा याकरिता आम्हीही धुळे पाटबंधारे विभाग यांच्याकडे वेळोवेळी मागणी केली आहे.- आर.एस.पाथलीकर, उपअभियंता
आठ महिन्यांपासून पथदिवे बंद
By admin | Published: February 03, 2017 12:52 AM