लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : शहादा तालुक्यातील कहाटूळ येथील अतीसाराच्या साथीने आरोग्य विभागाचे धिंडवडे निघत असताना आता अक्कलकुवा तालुक्याच्या अती दुर्गम भागातील मांडवा आरोग्य केंद्राच्या उदासिनतेबाबत आरोग्य विभागाची उदासिनता समोर आली आह़े तब्बल 12 गावे आणि 36 पाडय़ांच्या रूग्णांसाठी संजीवनी ठरणारे मांडवा आरोग्य केंद्र पत्र्याची खोली आणि कुडाच्या भिंतींआड सुरु असून पुरेशा सुविधांअभावी रूग्ण हैराण झाले आहेत़ सातपुडय़ाच्या अती दुर्गम भागात नर्मदा काठावरील मांडवी येथे जिल्हा परिषदेने प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती केली होती़ दुर्गम भागातील बामणी, डनेल, डेब्रामाळ, वेलखेडी, सांबर, कंजाला, सुरवाणी, मुखडी, मांडवा या प्रमुख गावातील रूग्ण आणि त्यांना लागून असलेल्या 36 पाडय़ांमधील रूग्णांसाठी महत्त्वपूर्ण ठरणा:या या आरोग्य केंद्राचे कामकाज अत्यंत कमकुवत अशा पत्र्याच्या खोलीतच सुरु आह़े तसेच रूग्णांना दाखल करून घेण्यासाठी याठिकाणी जागा नसल्याने पूर्वी जनावरांचा गोठा म्हणून वापरात असलेल्या कुडाच्या भिंतींआड खोली तयार करण्यात आली आह़े चार उपकेंद्रांचा समावेश असलेल्या या आरोग्य केंद्राची ही दैना माहिती असूनही आरोग्य विभागाकडून कारवाई करण्यात येत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े जिल्हा परिषदेकडून दुर्गम व अती दुर्गम भागातील आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांच्या बांधकामासाठी गेल्या पाच वर्षात कोटय़ावधी रूपये मंजूर करण्यात आले आहेत़ यात काही आरोग्य केंद्रांच्या इमारतींसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर होता़ एवढा निधी मंजूर होत असताना नेमका मांडवा आरोग्य केंद्राबाबत मात्र दुर्लक्ष करण्यात आले आह़े इमारतीसोबत सुविधांचा अभाव असलेल्या या केंद्रात वैद्यकीय अधिकारीही येण्यास अनुत्सुक असल्याचे सांगण्यात येते. प्रशासनाने याठिकाणी इमारत बांधकाम कामासह विविध सुविधांना मंजुरी देण्याची मागणी आह़े या भागात मलेरिया, सिकलसेल यासह इतर गंभीर आजार दिवसेंदिवस डोकेवर काढत असताना आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे येथील रूग्णांच्या समस्या अधिक वाढत आहेत़
मांडवा आरोग्य केंद्र पत्र्याच्या खोलीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 11:41 AM