नंदुरबार : बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सच्या अपघातानंतर प्रादेशिक परिवहन विभाग सतर्क झाला आहे. अपघाताच्या पार्श्वभूमीवर १ जुलैपासून गुजरात-महाराष्ट्र सीमेवरील बेडकी (ता. नवापूर) आणि गव्हाळी (ता. अक्कलकुवा) येथे तपासणी मोहीम राबवीत २ हजार १४८ वाहनांवर कारवाई करीत ७३ लाख रुपयांची दंडवसुली करण्यात आली आहे. ही मोहीम मंगळवारीदेखील सुरू होती.
जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्ग, शेवाळी-नेत्रंग महामार्गांवर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अपघातांचे मूळ कारण हे त्यातील तांत्रिक दोष असल्याने त्यांची तपासणी करणे आवश्यक असल्याचे लक्षात घेत नंदुरबार उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने सीमा तपासणी नाक्यांवर सर्वप्रकारच्या वाहनांची तपासणी सुरू केली होती. या मोहिमेसाठी नवापूर येथे २० मोटार वाहन निरीक्षक आणि ६ सहायक मोटार वाहन निरीक्षक अशा २६ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. गव्हाळी (ता. अक्कलकुवा) येथील सीमा तपासणी नाक्यावर ५ मोटार वाहन निरीक्षक व ४ सहायक मोटर वाहन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर यांच्या मार्गदर्शनात सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव व वरिष्ठ मोटार वाहन निरीक्षक महेश देशमुख हे या मोहिमेचे नेतृत्व करीत आहेत.गेल्या तीन दिवसांत सीमा तपासणी नाका नवापूर येथे १ हजार ७७३ वाहनांवर कारवाई करण्यात येऊन ६२ लाख ५० हजार एवढा दंड आकारण्यात आलेला आहे. सीमा तपासणी नाका, अक्कलकुवा येथे ३७५ वाहनांवर कारवाई करून दहा लाख ५८ हजार एवढा दंड आकारण्यात आलेला आहे. एकूण २ हजार १४८ वाहनांवर कारवाई करण्यात येऊन ७३ लाख ८ हजार दंड करण्यात आलेला आहे.