नंदुरबार : लॉकडाऊननंतर लालपरीची चाके धावू लागली असताना नंदुरबार तालुक्यातील अनेक गावांमध्ये अद्यापपर्यंत बससेवा सुरू झालेली नाही. तसेच थांबा असतानाही त्याठिकाणी बसेस थांबत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. म्हणून नंदुरबार आगाराने ग्रामीण भागातील बससेवा पूर्ववत सुरू करावी व चालक आणि वाहकांना थांब्याच्या ठिकाणी बसेस थांबविण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी राष्ट्रीय बंजारा परिषदेने केली आहे.
याबाबत नंदुरबार आगार प्रमुख मनोज पवार यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, कोरोनामुळे लॉकडाऊनच्या कालावधीत सहा महिने बससेवा बंद होती. आता शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्य परिवहन महामंडळाची बससेवा सुरू झाली आहे. सर्वसामान्यांची वाहिनी असलेली लालपरी पुन्हा रस्त्यावर धावू लागली आहे. परंतु नंदुरबार तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गावांच्या बससेवा अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. तसेच थांबा असतानाही त्याठिकाणी बसेस थांबत नाही. त्यामुळे प्रवाशांना अन्य वाहनांचा आधार घेऊन शहर व जिल्ह्याच्या ठिकाणी ये-जा करावी लागत आहे. नंदुरबार तालुक्यातील वंजारीपाडा, चिकीनीदगडी, गिरीशगाव, फुलसरा, सुंदरदे, करणखेडा, आदी गावांना बसथांबा आहे. याठिकाणी प्रवासी बसेसची प्रतीक्षा करतात. परंतु ये-जा करणार्या बसेस त्याठिकाणी थांबत नाहीत. तसेच काही गावांसाठी अद्यापही बससेवा पूर्ववत सुरू झालेली नाही. यामुळे शेतकरी, नागरिक व विद्यार्थ्यांची गैरसोय होऊन त्रास सहन करावा लागत आहे. नंदुरबार तालुक्यातील ग्रामीण भागातील बससेवा पूर्ववत सुरू करावी. त्याचबरोबर थांब्याच्या ठिकाणी बसेस थांबविण्यात याव्यात, अशी मागणी राष्ट्रीय बंजारा परिषदेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष मिलीन जाधव, जिल्हा उपाध्यक्ष भीम राठोड, जिल्हा कार्याध्यक्ष गुड्डू राठोड, नंदुरबार तालुकाध्यक्ष आकाश चव्हाण, शहराध्यक्ष विजय राठोड, सदस्य आशिष रामराजे, आदींनी केली आहे.