लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गुरुवारपासून नंदुरबारसह चार शहरात आठ दिवस होणारे संपुर्ण लॉकडाऊन लक्षात घेत बुधवारी बाजारात खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. नंदुरबार शहरासह शहादा, तळोदा, नवापूर येथे दिवसभर बाजारात झुंबड उडाली होती. कुठेही सोशल डिस्टन्सिंगचे पालन झालेले दिसून आले नाही. दरम्यान, या चारही पालिका क्षेत्रात लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे.नंदुरबार, शहादा या दोन शहरांसह तळोदा व नवापूर येथेही कोरोना रुग्ण वाढत आहेत. प्रशासनाने त्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. परंतु रुग्ण वाढीचा वेग कमी होत नसल्याची स्थिती आहे. जुलै महिन्यात तब्बल २०० पेक्षा अधीक रुग्ण आढळून आले आहेत. ही बाब लक्षात घेता आता चार पालिका क्षेत्रांमध्ये तब्बल आठ दिवस संपुर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कोरोनाची संपर्क साखळी खंडित करण्याचा प्रयत्न यातून राहणार आहे. त्याच पार्श्वभुमीवर या चारही शहरांच्या बाजारपेठेत खरेदीसाठी झुंबड उडाली होती.मागणी वाढल्याने टंचाईबाजारात भाजीपाला, फळे व खाद्यपदार्थ यांची मागणी अचानक वाढल्याने बाजारात या वस्तूंची टंचाई निर्माण झाल्याचे चित्र होते. त्यामुळे काही विक्रेत्यांनी भाव देखील वाढविले होते. त्यामुळे मिळेल त्या भावात नागरिकांना वस्तू खरेदी कराव्या लागत होत्या. किराणा दुकानांवर अक्षरश: रांगा लागल्या होत्या. याशिवाय खाद्य पदार्थ व बेकरींच्या बाहेर देखील रांगा दिसून आल्या. भाजीपाल्याला मागणी वाढल्याने त्याच्या दरात देखील वाढ झाल्याचे चित्र बुधवारी दिवसभर दिसून आले. दुसरीकडे नाशवंत खाद्य पदार्थांची लवकर विक्री व्हावी यासाठी मात्र प्रयत्न सुरू असल्याचे काही ठिकाणच्या विक्रेत्यांकडील चित्र होते.गर्दी नियंत्रणासाठी कसरतबाजारात खरेदीसाठी झालेली गर्दी नियंत्रणासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली होती. नंदुरबारातील उड्डाणपूल, सुभाष चौक, मंगळबाजार, सिंधी कॉलनी, पालिका चौक या भागात खरेदीसाठी गर्दी दिसून आली. येणारी वाहने आणि नागरिक यामुळे अनेक ठिकाणी रहदारीही खोळंबत असल्याचे चित्र दिसून आले. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी मात्र वाहतूक पोलीस आणि पोलिसांची मोठी कसरत होत असल्याचे चित्र दिवसभर दिसून येत होते.बॅरीकेटींग करणारशहरात लॉकडाऊनच्या दरम्यान काही ठिकाणी बॅरीकेटींग देखील लावण्यात येणार आहे. जेणेकरून विनाकारण शहरात येणाऱ्यांवर आळा घालता येईल असा उद्देश प्रशासनाचा आहे. त्यानुसार तयारी करण्यात आली आहे. पालिकांना त्यासाठी सुचना देण्यात आल्या असून ठिकाण निश्चिततीकरण करण्यात आले आहे.विनाकारण फिरू नयेलॉकडाऊन दरम्यान संपुर्ण बाजारपेठ बंद राहणार आहे. केवळ रुग्णालये, औषध विक्रीची दुकाने, शासकीय कार्यालये, बँका सुरू राहणार आहेत. तेथे जाण्यासाठी नागरिकांकडे सबळ कारण असणे आवश्यक आहे. विनाकारण शहरात कुणी फिरतांना आढळून आल्यास त्यांच्यावर आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला जाणार असल्याचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.चारही पालिका क्षेत्रात पेट्रोलपंप चालकांना देखील केवळ कोरोनासाठी काम करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांनाच पेट्रोल देण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी देखील नागरिकांची गर्दी झाली होती. सकाळपासूनच सहाही पेट्रोल पंपांवर वाहनांची गर्दी दिसून येत होती. रात्री उशीरापर्यंत ती कायम होती.
बाजारात खरेदीसाठी उडाली झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 12:34 PM