मनोज शेलार, नंदुरबार : भरधाव डंपरने दुचाकीला धडक दिल्याने गर्भवती महिला चिरडली जाऊन जागीच ठार झाल्याची घटना नंदुरबारातील करण चौफुलीवर शुक्रवारी दुपारी घडली. या अपघातात महिलेचा पतीही गंभीर जखमी झाला आहे.
कविता प्रकाश ठाकरे (२२) असे मयत महिलेचे नाव आहे. तर प्रकाश ठाकरे, रा. होळतर्फे हवेली, ता. नंदुरबार असे जखमीचे नाव आहे. प्रकाश व कविता ठाकरे हे तहसील कार्यालयातून आधार अपडेट करून परत आपल्या दुचाकीवर गावी जात होते. करण चौफुलीवरून जाणाऱ्या भरधाव डंपरने (क्रमांक एमएच ४६ बीएफ ९०६६) त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे मागील चाकाखाली आल्याने कविता यांचा चिरडल्या जाऊन मृत्यू झाला. कविता या नऊ महिन्याच्या गर्भवती होत्या. प्रकाश ठाकरेे यांना देखील गंभीर मार लागला. अपघातानंतर नागरिकांनी डंपर थांबवून ठेवत चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले.याबाबत नंदुरबार शहर पोलिसात डंपर चालकाविरुद्ध अपघातान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.