धडगाव : ठिकठिकाणांहून येणाऱ्या विक्रेत्यांकडून धडगाव बाजारपेठेत लोटगाडीवरुन उंदीर व अन्य भक्षकांच्या नियंत्रणासाठी असलेले विषारी औषध विक्री होत आहे. त्यांच्याकडून गुरांची व अन्य औषधीदेखील लोटगाडीवरुनच विक्री करण्यात येत असल्याची तक्रार धडगाव तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.
तालुका केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनमार्फत धडगाव तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात आठवडा बाजार व अन्य दिवशी धडगाव येथे उंदीर व अन्य भक्षक मारण्याच्या विषारी औषधांची जिल्हाभरातून येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून विक्री करण्यात येत आहे. ते बाहेरून येत असल्याने विविध प्रकारच्या लोटगाड्यांचा आधार घेत औषधी विकत आहेत. परंतु त्यांच्याकडून केवळ उंदीर मारण्याच्या औषधांची विक्री होत नाही, तर गुरांसाठी आवश्यक असलेली औषधी व अन्य औषधीदेखील विकली जात असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. या औषधांचा विष म्हणत चुकीचा वापरदेखील होण्याची शक्यता केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने वर्तवली आहे. अशा संभाव्य घटना टाळण्यासाठी संबंधित विक्रेत्यांवर योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हास्तर सदस्य नितीन सोनगरे, तालुकाध्यक्ष जामसिंग पराडके, उपाध्यक्ष प्रकाश विंचुरकर, सचिव दिनेश शिवदे, सहसचिव मोहन वळवी, दलीत जगदाळे, विजय हुरेज यांनी केली आहे.