ऑनलाईन लोकमत
शहादा, जि. नंदुरबार, दि.8 - शहादा तालुक्यातील सावखेडा येथे झालेल्या विशेष ग्रामसभेत गावात दारूबंदीचा ठराव पारित करण्यात आला. दोन दिवसानंतर गावात दारूची विक्री करणा:याला 10 हजार रुपयांचा दंड करण्याचा निर्णयही या सभेत घेण्यात आला. दारूबंदी निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली.
सावखेडा गावात दारूच्या व्यसनामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले असून तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे. अनेक जणांना कजर्बाजारीपणामुळे गावा सोडावे लागले असून दारूमुळे गावात नेहमी भांडण-तंटे सुरू असतात. या सर्व प्रकारांना गावातील महिला वैतागल्या होत्या. सभेच्या दोन दिवसापूर्वी 100 ते 150 संतप्त महिलांनी उपसरपंच मनीष पवार यांच्या घरावर मोर्चाही नेला होता. त्यावेळी उपसरपंच पवार यांनी महिलांना ग्रामसभा घेऊन दारुबंदीचा ठराव करण्याचे सांगितले होते. त्यानुसार सरपंच संपत आवासे, उपसरपंच मनीष पवार, पोलीस पाटील पुष्पा सोनवणे, अजरुन पवार, विजय सोनवणे, ग्रा.पं.सदस्य, ग्रामसेवक शरद गायकवाड, महिला व ग्रामस्थांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेण्यात आली. सभेत कलाबाई सोनवणे, निळूबाई निकम, जडीबाई ठाकरे, निर्मला ठाकरे, गौतमाबाई पिंपळे, भटीबाई सोनवणे यांच्यासह महिलांनी दारूबंदी करण्याचे निवेदन दिले. त्यानंतर ग्रामसभेत गावात दारूबंदीचा करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. गावातील दारू विक्रेत्यांनी दोन दिवसात त्यांच्याकडील दारूची विल्हेवाट लावावी व त्यानंतर दारू विक्री करताना आढळल्यास त्याच्यावर 10 हजार रुपये दंडाची कारवाई करून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येईल, असे उपसरपंच मनीष पवार यांनी सांगितले. दारूबंदीचा ठराव मंजूर झाल्यानंतर महिलांनी समाधान व्यक्त केले. दारूबंदीचा ठराव मंजूर झाल्यानंतर त्यावर नियंत्रण रहावे यासाठी 10 पुरुष व सात महिलांचा समावेश असलेली समिती गठीत करण्यात आली.