लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : एका सामान्य शेतकरी कुटुंबातून येऊन स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विक्रीकर निरीक्षकापासून तर आयपीएस अधिकारी पर्यंतचा नंदुरबारचे नवीन पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांचा प्रवास प्रेरणादायी आहे.
नंदुरबार येथे पोलीस अधीक्षकपदी पी.आर.पाटील यांची गुरुवारी नियुक्ती झाली आहे. येत्या दोन-तीन दिवसात ते नंदुरबारचा पद्भार स्वीकारणार आहे. त्यांनी १९९५ मध्ये विज्ञान शाखेची पदवी घेतली. त्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विविध टप्पे पार करीत ते आयपीएस झाले. या काळात त्यांनी १९९७ मध्ये विक्री कर निरीक्षक परीक्षा पास केली. पुढे १९९८ मध्ये तहसीलदारपदी त्यांची नियुक्ती झाली. तर १९९९ ला पोलीस उपाधीक्षक म्हणून पोलीस दलात रुजू झाले. त्यानंतर जळगाव येथे प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक म्हणून त्यांंनी काम पाहिले. पुढे पुणे येथे गुन्हे अन्वेषण शाखेत उपायुक्त म्हणून त्यांनी आपली कारकीर्द गाजविली. गेल्या वर्षी त्यांची कोल्हापूर येथे नागरी संरक्षण हक्क विभागाचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर आता ते नंदुरबारचे पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.