कार्यशाळेत सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी अंगणवाडी सेविका, रोजगार सेवक सहभागी झाले होते.
राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत माझी वसुंधरा टप्पा-२ हे अभियान सुरू आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येत आहे. शासनामार्फत माझी वसुंधरा टप्पा-२ राबविण्याबाबत मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. तसेच अभियान राबविण्याबाबत टप्पा -१ व टप्पा -२ यात अभियान राबविण्यासाठी राबविण्यात येणारे उपक्रम व गुणांकन पद्धती याविषयी माहिती देण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यशाळेत प्रकल्प संचालक राजेंद्र पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) डॉ. वर्षा फडोळ यांनी पृथ्वी, जल, आकाश, अग्नी, वायू या पंचतत्त्वांच्या संरक्षणासाठी राबवायचे उपक्रम याविषयी मार्गदर्शन केले. जिल्हा कक्षातील युवराज सूर्यवंशी यांनी पंचतत्व व त्यांच्या संरक्षणासाठी ग्रामपंचायत स्तरावर कोणकोणते उपक्रम राबविण्यात यावेत व त्यासाठी असणारी गुणांकन पद्धत याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत शहादा तालुक्यातील प्रकाशा, लोणखेडा, वडाळी, बामखेडा, खेड दिगर, कल्साडी, पुरुषोत्तम नगर, ब्राह्मणपुरी अक्कलकुवा, राजमोही, मोठी नंदुरबार तालुक्यातील धानोरा, नवापूर तालुक्यातील खोकसा, तळवे, गणेश बुधावल तालुका तळोदा अशा एकूण १५ ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, तालुकास्तरावरील विस्तार अधिकारी, शाखा अभियंता, मनरेगा विभागाचे तांत्रिक कर्मचारी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, अंगणवाडी सेविका, रोजगार सेवक उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुनील पाटील यांनी केले.