रमाकांत पाटील -नंदुरबार : पुनर्वसन, पर्यावरण आणि लाभहानीच्या मुद्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजणारा सरदार सरोवर प्रकल्पाचा मुद्दा सध्या गुजरात निवडणुकीत पहिल्या टप्प्यात सर्वच पक्षांनी प्रचाराचा मुद्दा बनवला आहे. भाजप त्याचे श्रेय घेऊन त्यातून गुजरातचा विकास केल्याचा दावा करीत आहे, तर आम आदमी पार्टी आणि काँग्रेसने मात्र या प्रकल्पाच्या विकासाचा दावा फोल ठरल्याचा आरोप केला आहे.
महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर गुजरातच्या हद्दीत साकारलेला सरदार सरोवर प्रकल्प गेल्या चार दशकांपासून विविध मुद्यांवरून चर्चेत आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील ३३ गावे व लाखो झाडे बुडितात गेली. अनेक कुटुंबांचा सिंचन तसेच जमिनीसाठी संघर्ष सुरूच आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सरदार सराेवराचा मुद्दा चर्चेत येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मे बनायू गुजरात...’ हा गुजराती लोकांना निवडणुकीचा संदेश दिला. त्यावर आधारित एक व्हिडीओही भाजपने जारी केला आहे. नर्मदा बचाववाले आमच्या जिवाचे दुश्मन झाले होते. तरीही. नर्मदेचे पाणी थेट कच्छला पोहोचेपर्यंत लढलो आणि जिंकलोही. हे मुद्दे आणि या विकासाची यशोगाथा व्हिडीओ दाखवून प्रकल्प प्रचाराचा मुद्दा बनवला आहे.
१ रुपयाच्या नाण्यांची भरली अनामत रक्कमगुजरातमधील गांधीनगर उत्तर विधानसभा मतदारसंघातून महेंद्र पटणी हे निवडणूक लढवत आहेत. ते रोजंदारीचे काम करतात. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी १ रुपयांची दहा हजार नाणी अनामत रक्कम म्हणून भरली. मित्रमंडळींनी इतकी नाणी गोळा करून पटणी यांच्याकडे सुपूर्द केली होती. गांधीनगर येथील महात्मा मंदिर भागातल्या ५२१ झोपड्या नुकत्याच हटविण्यात आल्या. त्या रहिवाशांचा प्रतिनिधी म्हणून मी निवडणुकीला उभा राहिलो आहे, असे पटणी यांनी सांगितले.
दुसऱ्या टप्प्यातील १,११२ अर्ज ठरले वैध -गुजरात विधानसभा निवडणुकांचा दुसरा टप्पा ५ डिसेंबर रोजी पार पडणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ९३ विधानसभा जागांकरिता होणाऱ्या निवडणुकांकरिता दाखल झालेल्या १५१५ अर्जांपैकी उमेदवारी अर्जांपैकी १,११२ अर्ज वैध ठरले आहेत. या राज्यातील विधानसभा निवडणुकांचा पहिला टप्पा १ डिसेंबर रोजी पार पडणार असून त्यावेळी ८९ जागांसाठी लढत होईल. गुजरात विधानसभा निवडणुकांत एकूण १८२ जागांसाठी लढत होणार आहे. त्यांची मतमोजणी ८ डिसेंबरला होऊन निकाल जाहीर करण्यात येतील.