'...त्यासाठी मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उभा राहिलो'; सत्यजित तांबेंनी स्पष्टच सांगितलं!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 15:16 IST2023-01-24T15:13:38+5:302023-01-24T15:16:24+5:30
नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे हे आज नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले होते.

'...त्यासाठी मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उभा राहिलो'; सत्यजित तांबेंनी स्पष्टच सांगितलं!
नाशिक पदवीधर मतदार संघाची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली असून सर्वच उमेदवार मोठ्या प्रमाणात प्रचार करतांना दिसत आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे हे आज नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यांच्या प्रचारसाठी आज छत्रपती शिवाजी महाराज नाट्य गृहात प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सत्यजित तांबे यांनी बोलताना सांगितले की काँग्रेसने उमेदवारी न दिल्यामुळेच मी अपक्ष उमेदवार म्हणून उभा राहिलो आहे. गेल्या वीस वर्षाच्या कार्यकाळात संघटनेच्या माध्यमातून आम्ही युवकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. कुठेतरी मोठे व्यासपीठ मिळावे व आपले विचार मांडण्यासाठी व युवकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ही निवडणूक लढवीत असल्याचे त्यांनी सांगितले. ही निवडणूक मतदान घेऊन निवडून येण्यासाठी नव्हे तर वडिलांचा वारसा व त्यांचे ऋणानुबंध पुढे सुरू ठेवण्यासाठीच लढत आहे, असे सत्यजित तांबे यांनी बोलताना सांगितले.
यावेळी अध्यक्षिय भाषणात माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले की डॉ.सुधीर तांबे हे पदवीधर, शिक्षक यांच्यासाठी काम करणारा आमदार आहे. यापुढेही पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका झाल्या होत्या पण आमदार कोण निवडायचा हे कळायचे नाही. डॉ. सुधीर तांबे यांच्यामुळे पदवीधर मतदार संघाची निवडणूक व आमदार कोण आहे हे कळाले. शिक्षक पदवीधर व संस्थाचालक यांच्या प्रश्न सोडवण्याचे सामर्थ्य सत्यजित तांबे यांच्यामध्ये असल्याने त्यांना निवडण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करा असे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी बोलताना सांगितले .यावेळी संख्येने शिक्षक पदवीधर मतदार व संस्थाचालक उपस्थित होते.