शहादा : तालुक्यातील ग्रामीण भागात यावर्षी आतापासूनच पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. नदी-नाले, धरण हे डिसेंबर-जानेवारी महिन्यातच कोरडे पडल्याने पाणीटंचाईची तीव्रता जाणवू लागली आहे. तालुक्यात ८४ गावे व २८ पाडे मिळून ११२ ठिकाणी पाणीटंचाईची समस्या निर्माण होणार आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आतापासूनच नियोजन करणे गरजेचे आहे.शहादा तालुका पंचायत समितीअंतर्गत असलेल्या ग्रामीण पाणीपुरवठा टंचाई कृती आराखड्यांतर्गत एक कोटी चार लाख ८८ हजार रुपयांच्या निधीचे नियोजन करण्यात आले असल्याचे समजते. तालुका प्रशासनाने तयार केलेल्या त्यांचे निवारण कृती आराखड्यांतर्गत तालुक्यात ८४ गावे व २८ पाड्यांचा त्यात समावेश आहे. तालुक्यात गेल्यावर्षी झालेल्या पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा ६० ते ७० झालेले आहे. या पावसात नदी-नाले, तलाव, धरणे यांच्यात पाण्याचा साठा अल्पसा होता. डिसेंबर-जानेवारी महिनाअखेरपर्यंत सर्व नदी-नाले, धरण व तलावांमध्ये खणखणाट झाला आहे. ग्रामीण भागात पाणीटंचाईची समस्या गंभीर होणार आहे. ऐन उन्हाळ्यात गुराढोरांना पिण्याच्या पाण्यासह चाऱ्याचा प्रश्नही शेतकऱ्यांपुढे उभा राहणार आहे.गेल्या तीन वर्षापासून गोमाई नदीच्या पात्रात मध्य प्रदेशात मोठे धरण बांधल्याने या नदीमध्ये पाण्याचा साठा कमी झाला आहे. यामुळे नदीकाठावर असलेले गोगापूर, रायखेड, लोणखेडा, पाटोदा, डामरखेडा यासह अनेक ठिकाणच्या कूपनलिका बंदअवस्थेत आहेत. ७०० ते एक हजार फूट खोल करूनदेखील पाण्याची पातळी मिळत नाही. शहादा तालुका टँकरमुक्त असला तरी पाण्याचे दुर्भिक्ष भविष्यात जाणवणार आहे. तात्पुरती पूरक नळ पाणीपुरवठा योजना घेण्यात आलेली असून सुमारे ३७ लाख रुपये निधीचा खर्च अंदाजीत करण्यात आलेला आहे. नवीन विंधन नवीन घेणे या कामासाठी कृती आराखड्यात ६२ गावे व २६ पाड्यांसाठी नियोजन करण्यात आले असून सुमारे ५४ लाख ५६ हजार रुपये निधीचे नियोजन करण्यात आले आहे. खाजगी विहीर व बोअरवेल अधिग्रहण करण्यासाठी २१ गावांची नोंद असून त्यासाठी १३ लाख ३२ हजार रुपयांच्या निधीचे नियोजन केले आहे. ८४ गावे व २८ पाडे अशा ११२ ठिकाणी एक कोटी चार लाख ८८ हजार रुपयाच्या निधीच्या खर्चाचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे. तालुक्यातील कोळपांढरी, बर्डीपाडा, घोडलेपाडा, नंबरपाडा, अंधारपाडा, आदल्यापाडा, भुरीना माळापाडा, कुंड्याापाणी, शंकरपाडा, टेगचपाडा, अमलीपाणी, केरला, पाणीआंबा, रतनपूर, जुनी लिबर्टी, मेंढ्यापाडा, सातपिंप्री, केवडीपाडा, मालपूरपाडा, लहान डोझा, नवलपूर, शिसापानी, काजू प्लांट, बामकुडपाडा, गºहाळपाणी, बापदेवपाडा, भावसिंगपाडा, बाडवानईकावाडा या पाड्यांवर उन्हाळ्यात पाणीटंचाईची तीव्रता भासणार आहे.शहादा तालुक्यातील नदी-नाले, तलाव व धरण यांना लागून असलेल्या ग्रामपंचायतीच्या पाड्यांच्या पाणीटंचाईबाबत ‘लोकमत’मध्ये गेल्या महिन्यापासून वृत्तमालिका सुरू आहे. या मालिकेतून कोणत्या गावाला किंवा पाड्यात पाणीटंचाई आहे, भासणार आहे याची माहिती संबंधित विभागाला प्राप्त होते. पाणीटंचाई भासणार असल्यास त्यासंदर्भात प्रस्ताव ग्रामपंचायतींनी संबंधित विभागाकडे दाखल केले आहेत.
शहाद्यातील ८४ गावे व २८ पाड्यांमध्ये टंचाई उपाययोजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2019 11:54 AM