मंदाणे : शहादा तालुक्यातील लोंढरे येथील एका तरुण शेतकºयाचा शेतातच निर्घृणपणे अज्ञात मारेकºयांनी ठार मारल्याच्या घटनेने परिसर हादरला असून ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. या खून प्रकरणाचे कोणतेही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागत नसल्याने खुनाचे रहस्य गुलदस्त्यात असून याचा उलगडा होऊन आरोपींचा शोध घेणे पोलिसांपुढे आव्हान ठरले आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, लोंढरे येथील शेतकरी भरत नरोत्तम पाटील (३८) यांचे लोंढरे गावापासून हाकेच्या अंतरावरच सहा एकर शेती असून तेथे कांदा लागवड केलेली आहे. ग्रामीण भागात विजेचे भारनियमन सुरू असल्याने रात्री १० ते सकाळी आठ वाजेपर्यंत शेतातील वीजपुरवठा सुरू असतो. भरत पटेल हे दररोज रात्री शेतात जाऊन कूपनलिकेद्वारे कांदा पिकाला पाणी भरण्याचे काम करीत होते. गुरुवार, २३ फेब्रुवारी रोजी रात्री नेहमीप्रमाणे जेवण करून भरत पाटील हे शेतात गेले. सकाळी आठ वाजेनंतर नेहमीप्रमाणे ते घरी परतले नसल्याने त्यांची आई शेताकडे गेली. त्या शेतात पोहोचल्यावर भरत पटेल हे खाटेवरच रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत दिसताच आईने हंबरडा फोडला. त्यांच्या रडण्याचा आवाज ऐकून आजूबाजूच्या शेतातील मजुरांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पांघरूण बाजूला करून पाहिले असता भरत पाटील हे मृतावस्थेत आढळून आले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत करून त्यांना जिवे ठार मारण्यात आल्याचे समजताच गावात एकच खळबळ उडाली. या खुनाच्या घटनेने परिसर हादरला असून शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.रहस्य गुलदस्त्यातलोंढरे गावाकडून जयनगर-धांद्रे गावाकडे जाणाºया रस्त्यापासून अर्धा किलोमीटरवर असलेल्या व गावापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शेतात एका प्रगतीशील, तरुण व कुटुंबातील कर्ता पुरुष असलेल्या शेतकºयाचा निर्दयीपणे अज्ञात मारेकºयांनी ठार मारण्याच्या घटनेने ग्रामस्थांसह कुटुंबीय सुन्न झाले आहेत. घटनास्थळी शहादा पोलिसांनी श्वानपथक व ठसेतज्ज्ञ मागवूनही तपासाचे धागेदोरे मिळाले नसल्याने या खुनाचे रहस्य गुलदस्त्यात आहे. मयत भरत पाटील हे गाव व परिसरात शांत व मनमिळावू स्वभावाचा माणूस म्हणून परिचित असल्याने त्यांच्याशी कोणाचाही कोणताही वैरभाव नव्हता. असे असताना त्यांना ठार मारण्याचा मारेकºयांचा उद्देश काय असावा? घटनास्थळी आरोपींनी कोणताही पुरावा मागे राहू दिला नसल्याने त्यांना पूर्वनियोजित कट रचून ठार मारण्याचा प्रकार तर नाही ना? अशीही शक्यता घटनास्थळावरील परिस्थितीवरून वर्तविण्यात येत आहे.आरोपींचा तत्काळ शोध घ्याभरत पाटील या तरुण शेतकºयाला निर्घृणपणे ठार मारण्याच्या घटनेचा पूर्णपणे उलगडा होऊन मारेकºयांचा त्वरित शोध घेण्यात यावा, अशी मागणी मयताच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांनी केली आहे. दरम्यान, या घटनेनंतर गावातून कोणी बेपत्ता झाले आहे काय याचाही शोध घेणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया काही सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केली आहे. भरत पाटील यांच्याच शेताला लागून असलेल्या शेतात मध्य प्रदेशातील आदिवासी शेतकरी गेल्या अनेक वर्षापासून जमीन खेडत आहेत. घटनेच्या रात्रीही बाजूच्या शेतातील कुटुंबीय तिथेच वास्तव्याला होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांचीही प्राथमिक चौकशी केली.दरम्यान, लोंढरे परिसर हा असलोद दूरक्षेत्राअंतर्गत असून या दूरक्षेत्रात ३९ गावे येतात मात्र पोलिसांची संख्या कमी आहे. पोलिसांची संख्या वाढवून या भागात रात्रीची गस्त सुरू करावी. त्यामुळे खुनासारख्या घटनांसह चोºयांच्या प्रकाराला आळा बसेल, अशी अपेक्षा परिसरातील शेतकºयांनी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)
खुनाच्या घटनेने लोंढरे परिसर हादरला
By admin | Published: February 26, 2017 12:02 AM