यंदाचे शैक्षणिक वर्ष १५जूनपासून सुरू झाले. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फक्त आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. शाळेचा पहिलाच दिवस असल्याने विद्यार्थी संख्या कमी असली तरी एकदाच्या शाळा सुरू झाल्याने आनंद दिसून येत आहे. नंदुरबार जिल्ह्यात येत्या काळात कोरोना अशाच पद्धतीने नियंत्रणात राहिल्यास पाचवी ते सातवीचे वर्ग देखील सुरू होण्याची शक्यता आहे.
विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
शाळेत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांची सुरुवातीला आरोग्य तपासणी करण्यात आली. शाळेच्या प्रवेशद्वारावरच थर्मल स्कॅनरद्वारे तसेच ऑक्सिमीटरद्वारे तपासणी करण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्याला मास्क अनिवार्य आहेच शिवाय सॅनिटायझरदेखील जवळ बाळगणे सक्तीचे आहे. काही शाळांनी आपल्या शाळेतील सार्वजनिक नळाजवळ साबणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
एका बेंचवर एकच विद्यार्थी बसविण्यात येत आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे यासाठी बेंचमधील अंतरदेखील वाढविण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांनी घोळक्याने उभे राहू नये किंवा बसू नये यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. एकमेकांचे साहित्य वापरण्याबाबतही सूचना देण्यात आलेल्या आहेत.