लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ‘बा विठ्ठला माङया शेतकरी राजाला सुखी ठेव, बळीराजा आनंदी तर देश आनंदी. भरपूर पाऊस पडू देण्याचे साकडे घालत भाविकांनी आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी केली होती. पटेलवाडी परिसरातून काढण्यात आलेल्या पालखी सोहळ्यामुळे धार्मिक वातावरण निर्माण झाले होते.आषाढी एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शहरातील मोठा मारुती मंदिर, देसाईपुरा, गणपती मंदिर परिसर व पटेलवाडी परिसरातील विठ्ठल मंदिरामध्ये सकाळपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागलेल्या होत्या. पटेलवाडीतील विठ्ठल मंदिरात सकाळी सहा वाजेच्या काकड आरतीपासून विविध कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली. दरम्यान सकाळी सात वाजताडॉ.प्रशांत वाघ व ब्रिजलाल चौधरी यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. यानंतर 10 वाजता परिसरातून वाजत-गाजत पालखी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत ‘विठ्ठल नामाची शाळा भरली’ सारख्या विविध धार्मिक गीते वाजवण्यात येत असल्याने भाविकांमध्ये उत्साह संचारला होता. पालखी सोहळ्यात महिलांनी फुगडय़ा खेळत आनंद साजरा केला. ठिक-ठिकाणी महिला भाविकांनी घरांसमोर आकर्षक रांगोळ्या काढून पालखीचे स्वागत करीत पूजा केली. या वेळी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रतिलाल चौधरी, उपाध्यक्ष बी.डी. परमार, सुरेश पटेल, भटू पाटील, राजू पाटील, खंडू लाडकर, गोरख चौधरी, खगेंद्र पटेल, चेतन पटेल आदी उपस्थित होते. सायंकाळी मंदिरात भाविकांनी मोठय़ा प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केली होती. या वेळी विविध व्यावसायिकानी दुकाने थाटल्याने यात्रेचे स्वरूप आल्यामुळे पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला.
पटेलवाडी परिसरातील विठ्ठल मंदिर परिसरात यंदाही यात्रा भरली होती. यासाठी दोन दिवसांपूर्वीच पाळणा व्यावसायिक दाखल झाले होते. यात्रोत्सवात लहान मुलांसाठी अनेक करमणुकीचे साधने उपलब्ध झाल्याने बालकांनी धम्माल मस्ती केली. विविध साहित्य विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती. त्यात पूजा विधीचे साहित्य, खेळणी, संसारोपयोगी वस्तुंच्या दुकानावर नागरिकांनी खरेदी केल्याने मोठय़ा प्रमाणात उलाढाल झाली.पांडुरंगाच्या दर्शनासाठी घाई गर्दी होऊ नये यासाठी महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र बॅरिकेटिंगची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच मंदिरातील विठ्ठल व रुक्मिणी मूर्तीची आकर्षक सजावट पुजारी भूषण कुलकर्णी यांनी केली.