लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पाचवीच्या वर्गांसह सहावी, सातवी व आठवीचे वर्ग बुधवार, २७ पासून सुरू झाले. शाळांमधील किलबिलाट पुन्हा कानावर आल्याने शाळांचा परिसर गजबजला. प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत आलेल्या अर्थात पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि कुतूहल स्पष्ट दिसून येत होते. तर सहावी ते आठवीचे विद्यार्थी जुने सवंगडी भेटल्याने आनंदीत झाले होते. कोरोनाच्या भितीचा कुठलाही लवलेश विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नव्हता. परंतु पालकांच्या मनातील भिती मात्र कायम होती. पाचवी ते आठवीचे वर्ग बुधवारपासून सुरू झाले. गेल्या आठ दिवसांपासून त्यासाठी तयारी सुरू होती. शाळा सॅनिटाईझ करण्यात आल्या. शिक्षकांच्या कोरोना चाचण्याही करण्यात येत असून ६० टक्के शिक्षकांची कोरोना चाचणी झाली आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी उपस्थिती कमी होती. असे असले तरी येत्या दोन ते तीन दिवसात उपस्थिती वाढेल अशी अपेक्षा शिक्षणाधिकारी एम.व्ही.कदम यांनी व्यक्त केली.
विद्यार्थ्यांची तपासणी शहरी भागातील शाळांसह ग्रामीण भागातील शाळांमध्ये येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची थर्मलगनद्वारे ताप तर ॲाक्सीमिटरद्वारे शरिरातील ॲाक्सीजनची तपासणी करण्यात आली. मास्क सक्तीचा करण्यात आला होता.
एक दिवसाआड वर्ग भरविणार... विद्यार्थी संख्या जास्त असलेल्या अनेक शाळा या एकदिवसा आड वर्ग भरविणार आहेत. त्यानुसार विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा पुरविता येणार आहेत. याशिवाय सलग एक ते पाच तासिका होणार असून मधली सुट्टी राहणार नाही
शिक्षण विभागाच्या आदेशानुसार कोरोना चाचणी केली. ती निगेटिव्ह आल्याने शाळेत आलो. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुचना दिल्या. मनातील भिती दूर केली.-जी.व्ही.पाटील, शिक्षक.
पाचवीच्या वर्गात यंदा प्रवेश घेतला आहे. शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच शाळेत येण्यास मिळाल्याने आनंद झाला. -मयुरेश जाधव,विद्यार्थी.शाळेचा पहिला दिवस व कोरोनाची भिती यामुळे आजच्या पहिल्या दिवशी मनात धाकधूक होती. परंतु शिक्षक व पालकांनी मनातील भिती दूर केली. -शारदा राजपूत, विद्यार्थीनी.
पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती चांगली होती. येत्या काही दिवसात उपस्थिती वाढविण्यावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. सर्व शाळांनी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना केलेल्या आहेत. पालकांनी नि:संकोचपणे पाल्यांना शाळेत पाठवावे. -एम.व्ही.कदम, माध्यमिक शिक्षणाधिकारी.