नंदुरबार : केदारेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या खोदकामात बुधवारी सायंकाळी नंदी व गणपतीची मूर्ती आढळून आली. विधिवत पूजा करून मूर्ती परिसरात ठेवण्यात आल्या आहेत. सहा महिन्याच्या कालावधीत देखील गावात देवीची मूर्ती व इतर मूर्ती सापडल्या आहेत.
प्रकाशा येथे तापी काठावर असलेल्या केदारेश्वर मंदिराचा जीर्णोद्धाराचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी जुना सभामंडप आणि इतर बांधकाम तोडण्यात येत असून खोदकाम देखील केले जात आहे. मंदिराच्या समोरच नारळ फोडण्यासाठी एक अडचणींची जागा होती. त्याठिकाणी खोदकाम करत असताना दहा फुटाचा खोलीवर काळ्या पाषाणातील पाच फूट उंचीचा एक नंदी निघाला. नंदी हा खंडित नसून अखंडित आहे.
सोबतच काळ्या पाषाणातील गणपतीची छोटी मूर्ती व दोन छोटे नंदीचे शिल्प देखील सापडले. निघालेल्या मूर्ती या परिपूर्ण आहे. कुठे खंडित दिसून आल्या नाहीत. मजुरांनी त्याला बाहेर काढले व पाण्याने स्वच्छ धुतले. यावेळी मंदिर संस्थांचे अध्यक्ष रामचंद्र पाटील, संचालक सुरेश पाटील व संबंधित ठेकेदार उपस्थित होते. यावेळी भाविकांची देखील मोठी गर्दी झाली होती.