नंदुरबार : शहरातील वाघेश्वरी टेकडी परिसरात राहणारी १० वर्षीय बालिका बेपत्ता झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत तिचा शोध लावण्यात आणि तिच्या घरी सुखरूप पोहोचविण्यात पोलिसांना यश आले. याबाबत शहर पोलिसात नोंद करण्यात आली होती.
वाघेश्वरी टेकडी परिसरात राहणारी १० वर्षीय बालिकेला तिच्या आईने दुधाची पिशवी घेण्यासाठी दुकानावर पाठविले होते. दुपारी ३ वाजता घरातून गेलेली बालिका रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने तिची शोधाशोध झाली. परिसरात खळबळ उडाली. या भागात कुठेच सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने तपासाचे आव्हान उभे ठाकले.
याबाबत बालिकेच्या आईने लागलीच शहर पोलिसात मुलगी हरविल्याची नोंद केली. अल्पवयीन असल्यामुळे अपहरणाची नोंद झाली. शहर पोलीस निरीक्षक किरण खेेडकर यांनी लागलीच सूत्रे हलविली. उपविभागीय अधिकारी सचिन हिरे यांनीही सूचना दिल्या. सहायक पोलीस निरीक्षक नंदा पाटील यांना तपासासाठी सूचना देण्यात आल्या. घटनास्थळ, नातेवाईक, परिचित या ठिकाणी शोध घेण्यात आला, संपर्क साधण्यात आला. अखेर एका ठिकाणी बालिका सुखरूप असल्याचे कळाल्यानंतर तिला पोलीस ठाण्यात आणून आईकडे सुपुर्द करण्यात आले.
याकामी हवालदार कृष्णा पवार, रवींद्र पवार, अमोल जाधव, संदीप गायकवाड यांनी प्रयत्न केले.