किशोर मराठे । लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम अतिदुर्गम भागातील लाभार्थीचे आयुष्यमान भारत योजनेसाठी कार्ड बनविण्यासाठी इंटरनेटची कनेक्टीव्हीटी मिळत नसल्याने सीएससी ऑपरेटर यांना लाभार्थीना सोबत घेऊन डोंगरमाथ्यावर लॅपटॉप व बायोमेट्रीक घेऊन नेटची रेंज शोधावी लागत आहे. त्यातच शून्य ते 14 वर्षे वयोगटातील लाभार्थीचे बायोमेट्रीक जुळत नसल्यानेही तीही एक डोकेदुखी ठरत आहे.अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम-अतिदुर्गम भागात इंटरनेट कनेक्टीव्हीटीची मोठी समस्या आहे. दुर्गम भागातच नव्हे तर अक्कलकुवा, मोलगी, काठी, खापर या सपाटीवरील भागातही ही समस्या आहे. सपाटीवरील भागात ही समस्या असताना अतिदुर्गम भागात तर कनेक्टीव्हीटी मिळणे फारच दूर आहे. तरीही सीएससी ऑपरेटर डोंगरमाथ्यावर जाऊन नेटची रेंज शोधण्याचा प्रय} करीत आहेत. सध्या अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम-अतिदुर्गम भागात केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत योजनेसाठी लाभार्थीचे कार्ड बनविण्याचे काम सुरू आहे. या योजनेच्या माध्यमातून कुंटुबातील एखाद्या व्यक्तीला गंभीर आजार झाला तर त्यांच्या वर्षभराच्या उपचारासाठी पाच लाख रूपयार्पयचा खर्च शासन करणार आहे. शासकीय आणि खाजगी रूग्णालयात या योजनेअंतर्गत लाभार्थीना लाभ मिळणार आहे. वृद्ध, अपंग लाभार्थी, ज्यांना चालता येत नाही, उठता येत नाही त्यांच्या घरी जाऊन सीएससी ऑपरेटर जाऊन हे कार्ड बनवून देतात. त्यासाठी लाभार्थीच्या कोणत्याही एका बोटाचा ठसा घेतल्यावर कार्ड बनविण्यात येते. तसेच ज्या लाभार्थीची नावे सुटलेली आहे, नावे चुकलेली आहे, लहान मुलांची, घरात नवीन आलेली सून त्यांची नावे कार्डात समाविष्ट करणे गरजेचे आहे. ही नावे अपडेट झाली नाहीत तर त्यांना या योजनेपासून वंचित रहावे लागेल. या योजनेपासून कुणीही लाभार्थी वंचित राहून नये यासाठी सीएससी ऑपरेटर प्रयत्न करीत आहेत. मात्र अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम-अतिदुर्गम भागात इंटरनेट कनेक्टीव्हीटी मिळत नसल्याची समस्या मोठी आहे. नेटची रेंज शोधण्यासाठी सीएसी ऑपरेटर यांना लॅपटॉप व बायोमेट्रीक सोबत घेऊन लाभार्थीसह डोंगरमाथ्यावर भटकंती करावी लागत आहे. वायफॉय रोटरच्या मदतीने नेटची रेंज शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे बीएसएनएलने यावर प्रभावी उपाययोजना करून ही समस्या दूर करण्याची मागणी होत आहे.दरम्यान, या भागात इंटरनेट कनेक्टीव्हीटीची मोठी समस्या असताना शून्य ते 14 वर्षे वयोगटातील लाभार्थीचे कार्ड बनविण्यासाठी बायोमेट्रीक जुळत नसल्याने ती एक डोकेदुखी ठरत आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील दुर्गम-अतिदुर्गम भागात आयुष्यमान भारत योजनेच्या लाभासाठी कार्ड बनवून देण्यासाठी काम सीएससी ऑपरेटर गावोगावी संबंधित लाभार्थीच्या घरी जाऊन माहिती गोळा करीत आहेत. मात्र जनजागृतीअभावी काही ग्रामस्थ ही योजना फसवेगिरी असल्याचे बोलून दाखवत असून सीएससी ऑपरेटर यांना सहकार्य केले जात नसल्याचाही प्रकार काही ठिकाणी घडत आहे. त्यामुळे अतिदुर्गम भागात या योजनेचा प्रचार व प्रसार होणे गरजेचे आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील कोणकोणत्या रुग्णालयात मोफत उपचार होणार आहेत याची माहिती त्या रुग्णालयाबाहेर लावून जनजागृती करणे गरजेचे आहे.