लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बाजार समिती कर्मचा:यांच्या दोन दिवसांपासूनच्या संपामुळे बाजारात भाजीपाला येत नसल्याची स्थिती आहे. मंगळवारी नंदुरबारचा आठवडे बाजार असतांनाही भाजीपाला विक्रेत्यांचा शोध घ्यावा लागत होता. ज्या विक्रेत्यांकडे होता त्यांनी देखील दुप्पट भाव केल्याने ग्राहकांची मोठी परवड झाली. दरम्यान, बाजार समिती कर्मचा:यांनी आपले कामबंद आंदोलन कायम ठेवले असून नंदुरबारसह चारही बाजार समितींमध्ये शुकशुकाट आहे.राज्यातील बाजार समिती कायम कर्मचा:यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून कर्मचा:यांचा लढा सुरू आहे. त्याचअंतर्गत सोमवार, 5 ऑगस्टपासून कर्मचा:यांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे जवळपास दैनंदिन 50 लाखांचा व्यवहार ठप्प झाला आहे. कामबंद आंदोलनाचा मंगळवारी दुसरा दिवस होता. त्याचे परिणाम आता जाणवू लागले आहेत.बाजार असूनही भाजीपाला नाहीमंगळवारी नंदुरबार व शहादा येथील आठवडे बाजार असतो. बाजारात ताजा भाजीपाला खरेदीसाठी ग्राहकांची विशेषत: महिलांची मोठी गर्दी होत असते. नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी महिला वर्गाने भाजीपाला खरेदीसाठी बाजारात धाव घेतली. परंतु किरकोळ एक, दोन विक्रेते सोडता कुठेही भाजीपाला विक्रेते नजरेस पडत नव्हते. त्यामुळे महिला वर्गासह ग्राहकांचाही हिरमोड झाला. दोन दिवसांपासून भाजीपाला खरेदी-विक्रीच झाली नसल्याचे बाजार समिती सूत्रांनी सांगितले. भाव कडाडलेभाजीपाल्याचा लिलाव होत नसल्यामुळे भाव कडाडले आहेत. सर्वच पालेभाज्या आणि फळवर्गीय भाज्यांचे दर भडकले आहेत. सर्वच भाज्या या दुप्पट दराने विक्री होत आहेत.
सोमवारपासून भाजीपाला मार्केटमध्ये भाजीपाल्याचा लिलावच झाला नाही. त्यामुळे लाखोंचा व्यवहार ठप्प झाला आहे. नंदुरबारात तालुक्यासह साक्री, पिंपळनेर, नवापूर, तळोदा भागाकडून भाजीपाला विक्रीसाठी येतो. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे भाज्यांची आवक मोठय़ा प्रमाणावर आहे. पालेभाज्या या नाशवंत असल्यामुळे त्यांची लागलीच विक्री होणे आवश्यक असते. परंतु भाजीपाल्याचा लिलावच होत नसल्यामुळे शेतक:यांनी आणलेला भाजीपाला स्वत:च थेट विक्री केल्याचे दिसून आले. शहरातील महाराणा प्रताप चौक, अमर चित्रमंदीर, दिनदयाल चौक आदी परिसरात अनेक शेतक:यांनी टेम्पो आणून भाजीपाला विक्री केल्याचे चित्र मंगळवारी सायंकाळी दिसून आले.