लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : कोरोना या महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तळोदा पालिकेने शहरातील सर्व भाजी व फळ विक्रेत्यांसह इतर विक्रेत्यांना बस स्थानकातील प्रशस्त जागा उपलब्ध करून दिली आहे. मात्र तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे दिसून येत असून, या वेळी सोशल डिस्टन्सींगचा अक्षरश: फज्जा उडत आहे. बहुसंख्य विक्रेते तोंडाला माक्सदेखील लावत नसल्याचे दिसून येत आहे. सदुैवाने आता पावेतो तालुक्यातील कोरोनाचे आशादायक चित्र असले तरी येथील गर्दीचे सुयोग्य नियोजन राखण्यासाठी अधिक चोख पोलीस बंदोबस्त लावण्याची गरज आहे.पालिकेने शहरातील विखुरलेले फळ, भाजी विक्रेते व लॉरीधारकांना बसस्थानकाच्या प्रशस्त जागी स्थलांतरीत केले आहे. यासाठी पालिकेने दुकानांसाठी लाईन टाकून चौकट आखून दिले आहे. साहजिकच गेल्या १० ते १२ दिवसांपासून हा बाजार तेथे सुरू झाला आहे. परंतु बाजारात भाजीपाला घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांची गर्दी होत असल्याचे चित्र आहे. परिणामी सोशल डिस्टन्सींगचा अक्षरश: फज्जा उडत आहे. एकाच दुकानावर ग्राहक गर्दी करीत असतात. त्यामुळे अंतर कुणीच पाळायला तयार नाही. त्याचबरोबर बहुसंख्य दुकानदार तोंडाला मास्क लावत नसल्याचे विदारक चित्रदेखील दिसून येत आहे. पालिका कर्मचाऱ्यांना दोन-तीन दिवसांपूर्वी काही विक्रेत्यांच्या तोंडाला मास्क नसल्याचे दिसून आल्यानंतर मास्क लावण्याबाबत कडक तंबी दिली होती. वास्तविक या महामारीच्या पहिल्या टप्प्यात सुदैवाने असा कुठलाच संशयित आढळून आला नाही. आता या महामारीच्या दुसºया टप्प्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे संभाव्य धोक्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातदृष्टीने प्रशासन, आरोग्य विभागाबरोबरच सर्वांनीच काळजी घेण्याची आवश्यकता आहे. तथापि या उलट बेजबाबदार नागरिक शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून भाजी मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सींगच्या नियमांना तिलांजली देत आहे. येथील वाढती गर्दी व भाजी विक्रेत्यांना शिस्त लावण्यासाठी पालिका व पोलिसांनी चोख बंदोबस्त लावण्याची मागणी जोर धरू लागली आहे. आता पावेतो शहर व तालुकावासियांनी कोरोनाच्या राक्षसावर निश्चित मात केली आहे.केंद्र शासनाने ग्राहकांच्या जनधन बचत खात्यावर ५०० रूपये वर्ग केले आहेत. ही रक्कम काढण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक शहरातील राष्टÑीयकृत बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत. अक्षरश: बँकांसमोर ग्राहकांच्या रांगा लागत असल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे सोशल डिस्टन्सींगलाही हरताळ फासला जात आहे. सद्या बँकांच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवला असला तरी ग्राहक ऐकायला तयार नाहीत. वास्तविक ग्रामीण भागातील ही गर्दी थोपविण्यासाठी बँक व महसूल प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे. परंतु याकडे गांभीर्याने घेतले जात नसल्याचा आरोप आहे. गेल्या आठवड्यात खासदार डॉ.हिना गावीत यांनी कोरोना बाबतच्या उपाययोजनांचा आढावा घेतला होता. या वेळी ग्रामीण भागातील ग्राहकांना गावातच रक्कम वाटपासाठी ग्राहक सेवा केंद्र अथवा बँकमित्र नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र या उपरांतही ग्राहकांच्या रांगा कमी होताना दिसून येत नाही. बुधवारी तालुक्यातील रानमहू येथील अतिशय वृद्ध पावरा दाम्पत्य आपले पैसे काढण्यासाठी बँकेत आले होते. परंतु दोन तास रांगेत उभे राहूनही नंबर लागला नाही. शेवटी थकवा आल्यामुळे माघारी परतल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासन आणि बँकांनी आपसातील समन्वय साधून सेवा केंद्र अथवा बँक मित्र सेवा ग्रामीण भागात तातडीने सुरू करावी, अशी मागणी आहे.
विक्रेत्यांचा बेफीकरपणा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 12:15 PM