लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन होत असतांना निर्णायक ठरलेल्या शिवसेनेला सत्तेत उपाध्यक्षपद व दोन सभापतीपद हवे आहेत. विशेष म्हणजे यासाठी भाजपचा होकार असल्याचेही समजते. तथापी मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतरच हा निर्णय होणार असल्याने सत्तेचा तिढा कायम आहे.नंदुरबार जिल्हा परिषदेत भाजप व काँग्रेसला प्रत्येकी २३ जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेला सात जागा मिळाल्या आहेत. बहुमताचा २९ हा आकडा जुळविण्यासाठी दोन्ही पक्षांना सेनेची मदत लागणार आहे. दोघांनी सेनेशी संपर्क साधून पाठींबा संदर्भात मागणी केली आहे. या पार्श्वभुमीवर शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी आज मुंबईत शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी चर्चा केली. त्यात त्यांनी माहिती दिली.पाठींब्यासंदर्भात त्यांच्याशी भाजपतर्फे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस व आमदार गिरीष महाजन यांनी तर काँग्रेसतर्फेही नेत्यांनी संपर्क साधल्याची माहिती त्यांनी संजय राऊत यांना दिली. तसेच सत्ता स्थापन करतांना शिवसेनेला उपाध्यक्षपद व दोन सभापतीपद हवे असल्याचे त्यांनी सांगितले.याबाबत स्थानिक स्तरावर भाजपचे आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांच्याशीही चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. सर्व बाबी ऐकुण घेतल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सर्व माहिती आपण देवू व त्यानंतर निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी माजी आमदार रघुवंशी यांना सांगितले.
सेनेला हवे उपाध्यक्ष व दोन सभापती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2020 11:59 AM