शहादा : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई भरारी पथकाने भल्या पहाटे कारवाई करत मद्याच्या तीन वहानांसह सुमारे ५५ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.याबाबत मिळालेली माहिती अशी की, १० रोजी पहाटे दरा गावाच्या हद्दीत शहादा-धडगाव रस्त्यावर परराज्यात निर्मित व अरुणाचल प्रदेश राज्यात विक्री करिता घेऊन जात असलेली तसेच दिल्ली व कलकत्ता येथील निर्मित व परदेशात विक्री करिता असलेले भा.ब.वि. मद्य तीन वाहनातून वाहतूक करीत असताना पकडून एकूण ५५ लाख १७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने जप्त केला.राज्य उत्पादन शुल्क आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, संचालक सुनील चव्हाण यांच्या आदेशान्वये व विभागीय आयुक्त प्रसाद सुर्वे यांचे मार्गदर्शनाखाली कार्यवाही केली. शहादा-धडगाव रोडवर पाळत ठेवून संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली. हिमाचल प्रदेश, वेस्ट दिल्ली व कलकत्ता येथे निर्मित, अरुणाचल प्रदेश व परदेशात विक्री करिता असलेले एकूण ९०० बॉक्स ( ७५० मि.ली. च्या दहा हजार ८०० सिलबंद बाटल्या) भारतीय बनावटीचे विदेशी मद्य अवैधपणे वाहतूक करताना दोन बोलेरो पीकअप व एक टाटा टेम्पो पकडून वाहनासह रुपये ५५ लाख १७ हजार ९०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. अनिल कहारू कोळी, तौहिद रहीम खान यांना अटक करून ताब्यात घेण्यात आले. महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला. मद्याचे मालक मुकेश चौधरी नामक असल्याचे समजते त्यास व चालकास फरार घोषीत केलेले आह.े कारवाई निरिक्षक दिपक परब, दुय्यम निरीक्षक दिलीप काळेल, जवान विशाल बस्ताव, सुधीर माने, दिपक कळंबे, सदाशिव जाधव यांनी केली. प्रकाश गौडा, निरीक्षक, शैलेंद्र मराठे, दिनेश ठाकुर दुय्यम निरीक्षक, जवान बागडे, पावरा, हेमंत पाटील यांनी सहकार्य केले.
शहाद्यात ५५ लाखांचा मद्यसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:31 PM